मुंबई १४ जून २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती असल्याच्या जाहिराती प्रसिद्धी झाल्यानंतर, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे सरकारवर निशाणा साधत हे सरकार दोन महिन्यात कोसळणार असल्याचा दावा केला आहे. हे सरकार अंतर्विरोधानेच पडणार आहे. राज्यात भाजपचे १०५ आमदार असलेला फडणवीस गट आणि ४० आमदार असलेला शिंदे गट यांच्यात छुपे युद्ध सुरू असुन हे सरकार कोसळेपर्यंत हे छुपे युद्ध सुरू राहील.
शिंदे गटाने काल प्रसिद्ध केलेल्या सरकारी जाहिरातीतून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो वगळला, यातुनच सर्व काही आलबेल नाही असे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल स्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी काहीही म्हटले तरी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसारच निर्णय द्यावा लागेल.न्यायालयाने यासाठी तीन महिन्याची मुदत दिली आहे. हे सरकार अपात्र ठरेल आणि हे सरकार दोन महिन्यात पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
यावेळी पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा साधा उल्लेख नाही. बाळासाहेबांचा फोटो नाही. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे आमची शिवसेना म्हणता आणि बाळासाहेबांचा फोटो नाही? काल भाजपने बांबू घातल्यामुळे, विशेषत: देवेंद्र फडणवीस यांनी बांबू घातल्याने, आज नवीन जाहिरात झळकलेली दिसते. पण पडद्यामागे बरेच काही घडले आहे. हे मला माहीत आहे. जो बुंद से गयी वो हौदसे नही आती असेही राऊत म्हणाले.
त्यांच्या अंतरंगात काय आहे, हे काल स्पष्ट झाले. त्यांचे बाळासाहेब ठाकरे नाहीत, आनंद दिघेही नाहीत आणि फडणवीसही नाहीत. हितचिंतक अशी जाहिरात देत नाहीत, शत्रू देतो. हितचिंतक जपून जाहिरात देतो. बाळासाहेब ठाकरे यांना विसरणारे हितचिंतक तुमच्याकडेच कसे? जरा डोके ठिकाण्यावर ठेवून बोला, असेही राऊत यांनी शिंदेंच्या प्रवक्त्यांना ठणकावले.
न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर