मुंबई २८ जून २०२३: महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने आज (२८ जून, बुधवार) मंत्रिमंडळ बैठकीत २८ मोठे निर्णय घेतले आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे नामकरण. आजपासून ते स्वातंत्र्य वीर सावरकर सेतू म्हणून ओळखले जाईल. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही सूचना केली होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. वर्सोवा-वांद्रे सी लिंक व्यतिरिक्त, MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आता अटल बिहारी वाजपेयी स्मृती सेतू म्हणून ओळखले जाईल.
दरम्यान, वांद्रे वर्सोवा सी लिंकचे नाव बदलण्याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र अशा परिस्थितीत आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वांद्रे वर्सोवा सी लिंक ‘वीर सावरकर सेतू’ म्हणून ओळखला जाईल, अशी घोषणा केली. महाराष्ट्रातील शिंदे सरकारमध्ये वीर सावरकरांची विचारधारा अत्यंत महत्त्वाची आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत, सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींच्या या विधानाचा कडाडून विरोध केला, यासोबतच त्यांनी महाराष्ट्रात सावरकर गौरव यात्राही काढली. सी लिंक बरोबरच आता मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे नाव बदलून अटलबिहारी वाजपेयी स्मृती सेतू करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- सूरज गायकवाड