गोठवणार्‍या थंडीत ध्येय गाठणारे ‘शिर्के’चे स्काऊट्स-गाईड्स

रा. भा. शिर्के प्रशालेच्या स्काऊट्स-गाईड्सची राजस्थानमधील कॅम्पमध्ये चमकदार कामगिरी

रत्नागिरी, ९ जानेवारी २०२३ : रत्नागिरीतील रा. भा. शिर्के प्रशालेचे स्काऊट्स-गाईड्स यांनी राजस्थानमधील नेमली ब्राह्मण रोहत (जि. पाली) येथील राष्ट्रीय जांभोरी कॅम्पमध्ये चमकदार कामगिरी करीत आहेत.

राजस्थानमधील पाली जिल्ह्यात सुमारे २२० हेक्टर जागेत आयोजित या जांभोरी कॅम्पमध्ये सुमारे ३५ हजार स्काऊट- गाईडचे विद्यार्थी ३५०० तंबूंत सहभागी झाले आहेत. संपूर्ण देशभरातून; तसेच दक्षिण कोरिया, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका आदी देशांमधीलही बालवीर आणि वीरबाला या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या १८व्या राष्ट्रीय जांभोरीचे उद्घाटन नुकतेच झाले.

यावेळी सर्व उपस्थित स्काऊट्स आणि गाईड्स यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मार्गदर्शन केले. तब्बल ६७ वर्षांनंतर राजस्थान येथे संपन्न होत असलेल्या या १८ व्या राष्ट्रीय जांबोरी शिबिरात जिल्ह्यातील रा. भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी, राणे इंग्लिश मीडियम स्कूल लांजा, पाचल हायस्कूलचे स्काऊट्स आणि गाईड्स; तसेच रोव्हर आणि रेंजर सहभागी झाले आहेत.

रा. भा. शिर्के प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मराठमोळे झांजपथक संपूर्ण देशभरातील स्काऊट्स आणि गाईड्स आणि उपस्थित मान्यवरांसमोर सादर करून उपस्थितांची मने जिंकली; तसेच २५ पैकी सुमारे २२ खेळांमध्ये; तसेच आठपैकी सहा, तर गाईड्सनी आठपैकी आठ बौद्धिक खेळांमध्ये आपला चमकदार सहभाग नोंदविला आहे. त्याचबरोबर १६ पैकी १६ गमतीदार खेळांमध्येही आपला सहभाग नोंदविला आहे. त्याचप्रमाणे विविध गाठींच्या आणि काठ्यांच्या आधारे विविध प्रकारची आकर्षक गॅझेट्स बनविली आहेत; तसेच दररोज तंबूंची विविध प्रकारे सजावट केली असल्याचे समजते. विविध उपक्रमांमध्ये यशस्वीरीत्या सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. सहभागी विद्यार्थ्यांमध्ये सर्वेश भाटे, गौरी माळी, वेद शिंदे, सोहम रसाळ, ओम कामत, आर्यन ठाकूर, पार्थ सावंत देसाई, ऋषिकेश नागले, चैतन्य बर्वे आदी स्काऊट्स, तर जाई पालेकर, निधी सावंत, मनाली देसाई, विधी जाधव, संपदा हर्डीकर, नेहा डोंगरे, गायत्री म्हामुणकर, मुद्रा कदम, महंती शिर्के आदी गाईड्स सहभागी झाले आहेत. त्यांना प्रशालचे स्काऊट शिक्षक श्री. पी. सी. जाधव, गाईड शिक्षिका सौ. टी. जे. यादव, गाईड सौ. पिलणकर स्काऊट श्री. नाचणकर मार्गदर्शन करीत आहेत. सध्या सुरू असलेल्या या १८व्या राष्ट्रीय जांभोरी दहादिवसीय शिबिरात चमकदार कामगिरी केल्याबद्दल रा. भा. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष विजय साखळकर, कार्यवाह सतीश शेवडे, सहकार्यवाह श्रीकांत दुदगीकर, शिक्षणाधिकारी सौ. सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी श्री. गावंड, जिल्हा स्काऊट संघटक श्री. डिंगणे, जिल्हा गाईड संघटक सौ. माहुरे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. आर. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापक श्री. के. डी. कांबळे, पर्यवेक्षिका सौ. पी. एस. जाधव; तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही चार अंश सेल्सिअस डिग्री इतक्या गोठवणाऱ्या थंडीत ध्येय गाठणाऱ्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : जमीर खलफे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा