शिवसंवाद यात्रा…

मुंबई, २१ जुलै २०२२: आदित्य ठाकरेंनी आता निर्धार यात्रेवरुन शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली. आज भिवंडीत ही शिवसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात त्यांनी अनेक मुद्द्यांना हात घातला.

यावेळी बोलताना शिंदेगटावर निशाणा साधत त्यांनी सांगितले की, २० जून ते २० जुलै महिनाभर महाराष्ट्रात क्लेशदायक वातावरण पसरले होते. महाराष्ट्रात दु:खाचे वातावरण आहे. सगळं सुरळित रहात असताना पाठीत खंजीर का खुपसला? यांच्यात कधीच शिवसेना नव्हती आणि नसणार आहे. हे आता गद्दार म्हणून राजकारणात काम करत आहे. हे राजकारण नव्हे तर एक सर्कस आहे. असं त्यांनी निक्षून सांगितलं. आम्ही स्वत:च्या खासदारांवर, आमदारांवर लक्ष नव्हे, तर विश्वास ठेवला. त्यांच्यावर अंधविश्वास ठेवला. त्यांनीच आम्हाला दगा दिला. जे गेले त्यांच्या रक्तात शिवसेना नव्हती. हा उठाव नव्हे, तर गद्दारी असल्याचा घणाघात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला.

पुन्हा एकदा त्यांनी सांगितले की, जर थोडी लाज असेल तर राजीनामा द्या. पुन्हा निवडणूक लढा. हे सरकार लवकरच कोसळणार, शिंदे- भाजप सरकार कोसळणार, असं आदित्य ठाकरे यांनी या शिंदेगटावर आरोपांच्या फैरी झाडल्या. ही गद्दारी केवळ राजकारणाशी नव्हे तर माणुसकीशीदेखील असल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा उद्धव ठाकरे रुग्णालयात होते, त्यावेळी या आमदारांनी जुळवा जुळव केली होती. असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला.

पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी अशा यात्रेतून शिवसैनिकांना गोळा करण्याचे शिवधुनष्य हाती घेतले आहे. पण हे शिवधनुष्य खरंचं त्यांना पेलवणार का ? हा प्रश्न समोर आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे आता तेवढी परत ताकद जमणार का आणि आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचा परिणाम होतो का? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तरीही आता शिवसेनेला भगदाड पडण्याची प्रक्रिया सुरु आहे. ती जरी थांबली तरी देखील सेना सावरणं, हे जिकरीचं काम आहे. जर फत्ते झालं तर ठीक अन्यथा गळती सुरुच, हेच सत्य आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा