खालापूर, रायगड, १७ जानेवारी २०२४ : चिंचवडचे माजी महापौर आणि नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केलेले संजोग वाघेरे-पाटील यांनी पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेऊन पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतले.
संजोग वाघेरे-पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत हजारो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला त्यावेळी त्यांना मावळ मतदार संघाची मोठी जबाबदारी देण्यात आली. मावळ मतदार संघात वाघेरे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पिंपरी-चिंचवड चे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे.
सन २००९ साली मावळ मतदार संघाची स्थापना झाली. या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहे. मावळ मतदार संघ उदयास आल्यापासून स्वर्गीय माजी खासदार गजानन बाबर हे पहिल्यांदा निवडून आले. त्यांनतर २०१४ ते २०१९ या काळात सलग दोन वेळा खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे निवडून आले. मात्र शिवसेना पक्ष फुटीनंतर खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्याने लोकांनी बारणे यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
मावळ मतदार संघात संजोग वाघेरे यांना संघटक पद देऊन भविष्यात त्यांना मावळ लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे नाकारता येत नाही. जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी संजोग वाघेरे यांना आशीर्वाद दिले असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : दत्तात्रय शेडगे