शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण

मुंबई, २४ सप्टेंबर २०२०: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील आणखी एका मंत्र्याला करोनाची लागणी झालीय. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना करोनाची लागण झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिलीय. बुधवारी शिंदे यांनी करोनाची चाचणी केली होती त्यानंतर आजच त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपली प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. तसंच संपर्कात आलेल्यांना योग्य काळजी घेण्याचं तसंच करोना चाचणी करण्याची विनंती केली आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती”.

भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते. इमारत कोसळ्याचं वृत्त कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. भिवंडी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची ही त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली होती. दरम्यान, मंगळवारी झालेल्या मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेतही एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यावेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे देखील उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकदा ते मतदारसंघातही फिरत होते. तसंच, सततच्या संपर्कामुळं त्यांना करोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा