एसीबी कडून चौकशी लावण्याची धमकी देऊन सुरतला नेलं, शिवसेना आमदार नितीन देशमुखांचा गंभीर आरोप

अकोला, १९ सप्टेंबर २०२२ : एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंडखोरी केली. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी झाल्याचेही पाहायला मिळाले. बंडखोर आमदार सुरत सुरतहुन गुवाहाटीला गेले. या घडलेल्या सत्ता नाट्यानंतर आता एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आमदार नितीन देशमुख यांनी धक्कादायक वक्तव्य केले आहे. आपल्याला एसीबीकडून चौकशीची धमकी देऊन सुरतला घेऊन गेल्याचा गंभीर आरोप आमदार देशमुख यांनी केला.

बंडखोरीतुन राज्यात झालेल्या सत्तांतरा नंतर आता आरोप-प्रत्यारोपाना उधाण आले आहे. अकोला जिल्ह्यातील ठाकरे समर्थक शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये धक्कादायक वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यावेळी आमदार देशमुखसुद्धा त्यांच्यासोबत सुरतला गेले होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्रात जे सत्तांतर झाले आहे त्याचा मी साक्षीदार आहे. पैसे घेऊन हे सत्तांतर घडवण्यात आले आहे. आम्हाला ईडी आणि एसीबी ची धमकी देता, आम्हीच येतो आम्हाला खुशाल जेलमध्ये टाका. शिवसेनेसाठी आम्ही जेलमध्येही जायला तयार आहोत असे देशमुख यावेळी म्हणाले. मी बंडखोरी न केल्याने मला एसीबीकडून चौकशीची धमकी देण्यात आली होती. असा आरोपही नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर केला.

महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल करण्यासाठी मागील दीड वर्षांपासून षडयंत्र रचले जात होते. पन्नास खोके एकदम ओके म्हणणाऱ्यांनी, माझ्यावर पुन्हा चुकीच्या कारवाया केल्या तर आपल्याकडे पण काही क्लिप आहेत. ज्यांनी महाराष्ट्रात सत्तांतर घडवून उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांच्या सुद्धा क्लिप आपल्याकडे आहेत. असा इशाराच आमदार देशमुख यांनी शिंदे गटाला दिला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा