पुरंदर ,३ जानेवारी २०२१ : ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये उद्या अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे गावागावात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्ते नेते व जुनेजाणते प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बिनविरोध निवडणुका म्हणजे लोकशाहीचा अनादर असल्याचे म्हटल्याने बिन विरोध निवडणुकीला आता अनेक ठिकाणी ब्रेक लागला आहे.
पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होईल त्या ग्रामपंचायतीला २५ लक्ष रुपयांचा विकास निधी आमदार व खासदार फंबाच्या माध्यमातून देण्यात येईल, असे म्हटले होते. त्यामुळे हा २५ लाखाचा निधी मिळवण्यासाठी तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून गावच्या विकासासाठी २५ लाखाचा निधी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सुरुवातीच्या काळात ६८ ग्रामपंचायती पैकी किमान निम्म्या तरी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होतील असे वाटत होते. मात्र पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी या बिनविरोध होणाऱ्या या प्रक्रियेवर आक्षेप घेत, ही लोकशाहीची मुस्कटदाबी असल्याचे म्हटले होते. अर्थात आमदार किंवा खासदार फंडातील २५ लाखाच्या विकास निधीचे आमिष दाखवून लोकांना ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायला लावणे हे एक प्रकारे दबाव आणण्याचा प्रकार असल्याचे शिवसेनेसह इतर पक्षांकडून सुद्धा बोलले जात आहे. शिवतारे यांनी आवाज उठवल्यानंतर आता तालुक्यातील शिवसैनिक जोरदार कामाला लागले असून जास्तीत जास्त ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली दिसते आहे. विजय शिवतारे हे सध्या तालुक्यात नसल्याने जास्तीत जास्त ग्रामपंचायती बिनविरोध आणून या ग्रामपंचायतींवर आपल्या विचाराचे लोक असावेत असा प्रयत्न आमदार संजय जगताप यांच्याकडून केला जात असल्याचे एकंदरीत चित्र होते. मात्र गेल्या दोन दिवसात गावागावांमधून पार पडलेल्या बैठकांमधून शिवसैनिकांनी जोरदार बॅटिंग केल्यामुळे पुरंदर तालुक्यातील अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होताना पाहायला मिळणार आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची युती असल्याने व पुरंदर तालुक्यामध्ये हे तिन्ही पक्ष प्रबळ असल्याने या युतीतून पुरंदर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध होणे अपेक्षित होते. मात्र ऐनवेळी शिवसेनेकडून त्यात कोलदांडा टाकण्यात आल्याने आता अनेक ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा विषय सोडून दिला आहे. उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने याबाबतचे चित्र उद्या दुपारी तीन नंतर च स्पष्ट होणार आहे.
राष्ट्रवादीला फटका
पुरंदर तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा सामना अनेक गावांमधून पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र असले तरी तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे वर्चस्व असावे म्हणून काँग्रेसच्यावतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. ही टीम जास्तीत जास्त गावातील निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्नशील होती. त्याचबरोबर काँग्रेसच्या विचारांचे ग्रामपंचायत प्रतिनिधी निवडून यावेत म्हणून प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र यामध्ये फरफट होताना पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला गृहीत धरून काँग्रेसने पॅनल उभे केले आहेत. यामध्ये कॉंग्रेसच्याच लोकांचा जास्त भरणा असल्याचे दिसून येते. तालुक्यात अनेक ठिकाणी कॉंग्रेस शिवसेना असा सरळ लढा पाहायला मिळणार आहे. तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नीरा येथे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये सरळ लढत पाहायला मिळणार आहे. कॉंग्रेसच्याच विचाराची ग्रामपंचायत असावी म्हणून निरा विकास आघाडी मध्ये सुद्धा कॉंग्रेस मधील सदस्यांनाच प्राधान्य देण्यात आले आहे त्यामुळे विकास आघाडीत फूट पडणार असल्याचे दिसते आहे. मात्र खरे चित्र उद्या दुपारी तीन नंतर स्पष्ट होईल.
न्यूज अनकट प्रतिनिधी:- राहुल शिंदे