मुंबई, ४ मार्च २०२३ : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी क्रिकेटच्या बॅट आणि स्टंपने सशस्त्र मुखवटाधारी व्यक्तींनी हल्ला केला होता. मनसे नेत्याने पोलिसांना दिलेल्या निवेदनात, हल्लेखोरांमध्ये शिवसेनेचा हात असल्याचा दावा केला आहे. मनसे नेते आणि पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर हल्ल्याप्रकरणी ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे. ‘एफआयआर’मध्ये शिवसेनेच्या एका युवा नेत्याचे नाव असून, तो ठाकरेंचा जवळचा नेता असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात मनसे नेत्याने असा दावा केला की, हल्लेखोरांपैकी एक तरुण म्हणाला की, तुम्ही ठाकरेंशी पंगा घेतला. मारहाण करताना हल्लेखोरांनी अपशब्द वापरल्याचेही त्यांनी सांगितले. मनसेचे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी चार जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या हल्ल्यात मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या उजव्या हाताला दोन फ्रॅक्चर झाले असून, त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. मनसे नेत्याने आपल्या हल्लेखोरांचा तपशीलही पोलिसांना दिला आणि सांगितले की, ते पुन्हा कधी भेटले तर ते त्यांना ओळखतील. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके तयार करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असून, या हल्ल्यामागे युवासेना नेत्याचा हात असल्याचा दावा केला आहे. श्री. राणे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून देशपांडे वरुण सरदेसाई यांच्यावर आरोप करीत आहेत. मागील सरकारमधील सरदेसाई यांची ताकद आपल्या सर्वांना माहीत आहे. आता देशपांडे यांच्यावर हल्ला झाला, सरदेसाई यांच्या भूमिकेची चौकशी झाली पाहिजे.
या प्रकरणाची अधिक माहिती देण्यास नकार देताना अधिकारी म्हणाले की,आम्हाला हल्लेखोरांबद्दल काही माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७ ( हत्येचा प्रयत्न) आणि ५०६ -२ ( गुन्हेगारी धमकी) नुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. देशपांडे यांचे पक्षाचे सहकारी अखिल चित्रे यांनी नंतर एक व्हिडिओ जारी करून हल्लेखोरांनाही त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असे म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड