सोनं खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये बदल, १ एप्रिल पासून होणार लागू

नवी दिल्ली, ४ मार्च २०२३: Gold Hallmarking: जर तुम्ही ३० मार्चनंतर सोनं किंवा त्याचे दागिने खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही बातमी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारने सोनं आणि दागिन्यांच्या खरेदी-विक्रीचे नियम बदलले आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने म्हटलंय की ३१ मार्च २०२३ नंतर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि कलाकृती विकल्या जाणार नाहीत.

४ अंकी आणि ६ अंकी हॉलमार्किंगबाबत ग्राहकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयाने म्हटलंय. नवीन नियमानुसार, १ एप्रिलपासून, फक्त सहा अंकांसह अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग वैध असेल. त्याशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत. तसेच चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

सोन्याचं हॉलमार्किंग हे मौल्यवान धातूच्या शुद्धतेचं प्रमाणपत्र आहे. हे १६ जून २०२१ पर्यंत स्वेच्छेने लागू होतं. यानंतर सरकारने सोन्याचं हॉलमार्किंग अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात आणखी ३२ जिल्हे जोडण्यात आले. आता त्यात देशातील आणखी ५१ जिल्हे जोडले जात आहेत.

अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल यांनी शुक्रवारी भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या क्रियाकलापांची आढावा बैठक घेतली. यामध्ये त्यांनी BIS ला देशात चाचणीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले. याशिवाय बीआयएसला उत्पादन चाचणी आणि बाजार निरीक्षणाची वारंवारता वाढवण्यास सांगितलं होतं.

त्यांनी BIS ला प्रेशर कुकर, हेल्मेट आणि इतर ग्राहक उत्पादनं यांसारख्या विविध उत्पादनांसाठी बाजारपेठेतील देखरेख वाढवण्याचे निर्देश दिले. गोयल म्हणाले की, भारतातील सर्व उत्पादनं सर्वोच्च गुणवत्ता आणि सुरक्षितता मानकांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

या बैठकीत निर्णय घेण्यात आला की, BIS विविध उत्पादन प्रमाणन योजनांसाठी प्रमाणीकरणावर ८० टक्के सवलत देईल किंवा किमान मार्किंग शुल्क आकारेल. मायक्रो स्केल युनिट्समध्ये गुणवत्ता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय.

काय आहे HUID क्रमांक

दागिने ओळखण्यासाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक वापरला जातो. HUID क्रमांक हा सहा अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे. त्याच्या मदतीनं, ग्राहकांना दागिन्यांशी संबंधित माहिती मिळते. याशिवाय ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर अपलोड करावी लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा