पुणे, ५ मार्च २०२३ : माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर ऊर्फ हनुमंतराव भाऊराव पाटील (वय ८१) यांनी रविवारी (ता. ५ मार्च) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास चाकूरकर यांच्या ‘देवघर’ निवासस्थानी स्वत:च्या पिस्तुलाने गोळी झाडून आत्महत्या केली.
शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील सद्भावनानगरमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे ‘देवघर’ हे निवासस्थान आहे. याच परिसरातील एका फ्लॅटमध्ये चंद्रशेखर पाटील कुटुंबीयांसोबत राहतात. दररोज ते सकाळी वॉकला बाहेर जात असत. त्यानंतर ते शिवराज पाटील यांच्या घरी येत असत. हा त्यांचा नियमित कार्यक्रम होता. चंद्रशेखर पाटील चाकूरकर हे वडिलोपार्जित शेती पाहत होते; तसेच त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. यातच ते अनेक व्याधींनी त्रस्त होते. ते सततच्या आजारपणालाही कंटाळले होते. यातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं असावं. सकाळी त्यांनी अनेकांना ‘गूड बाय’ असा मेसेज पाठविला होता. काहीवेळाने त्यांनी व्हॉट्स ॲपवरही ‘गूड बाय’ असे स्टेट्स ठेवले होते. चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
चंद्रशेखर पाटील यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती तत्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याबाबत चंद्रशेखर पाटील यांचे चिरंजीव अॅड. लिंगराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील