दिल्लीत ‘आप’ला धक्का, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआय चा छापा

14

नवी दिल्ली, १९ ऑगस्ट २०२२: दिल्लीमध्ये सीबीआय कडून वीस ठिकाणी छापेमारी करण्यात आली. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरासह वीस वेगवेगळ्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यामध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. छाप्या विषयी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी स्वतः ट्विटर वरून माहिती दिली आहे. आपण सीबीआयचे स्वागत करतो. चौकशीसाठी मी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. त्यामुळे सत्य लवकरच बाहेर येईल.

सिसोदिया यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे, आजपर्यंत माझ्यावर अनेकदा केसेस झाल्या परंतु निष्पन्न काहीच झाले नाही. आताही तसेच घडेल. देशातील शैक्षणिक प्रगतीसाठी माझे काम थांबवता येणार नाही. आम्ही लाखो मुलांचं भविष्य घडवत आहोत. अशा कामात येणारी बाधा खेदजनक आहे. आपल्या देशात जो चांगले काम करतो त्यालाच त्रस्त केले जाते. अशामुळे आपला देश कधीच नंबर एक बनू शकला नाही.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया यांचे ट्विट रिट्वीट करून म्हटले आहे की, ज्या दिवशी दिल्लीच्या शैक्षणिक मॉडेलचे कौतुक झाले आणि मनीष सिसोदिया यांचा फोटो अमेरिकेतील सर्वात मोठे वर्तमानपत्र एन वाय टी च्या पहिल्या पानावर छापला गेला त्याच दिवशी त्यांच्या घराच्या दिशेने सीबीआयला पाठवलं गेलं. सीबीआयचे स्वागत आहे. तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल. नेहमीप्रमाणे यावेळीही काहीही बाहेर येणार नाही. संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलमुळे आकर्षित झाले आहे. हेच त्यांना नको आहे म्हणूनच दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांच्या घरावर छापा टाकला जात आहे. आजपर्यंत ज्यांनी चांगले काम करण्यासाठी प्रयत्न केला त्यांना अडथळे निर्माण केले गेले त्यामुळे देश मागे राहिला. यापुढे दिल्लीतील कोणतीही चांगली कामे थांबू दिली जाणार नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अनिल खळदकर