वसतिगृहातील आदिवासी मुलींना पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघड, तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा दाखल

नाशिक २० जून २०२३: नाशिकमध्ये चक्क आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता पोलीस करतायत. नाशिकच्या पहिने परिसरातील चिखलवाडी या गावात, सर्वहरा परिवर्तन शिक्षण संस्थेच्या अंतर्गत वसतिगृह आहे. याच ठिकाणी राहणाऱ्या आणि शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींसोबत हा धक्कादायक प्रकार घडलाय.

या परिसरात पर्यटकांचा गृप राहण्यासाठी आला होता. याच पर्यटकांसमोर या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना नाचवल्याचा आरोप पालकांनी केलाय. वारंवार अशा प्रकारे, येथे येणाऱ्या पर्यटकांसमोर आपल्या मुलींना शिक्षण संस्थेकडून बळजबरीने नाचवले जाते, असा आरोप करत पालकांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय अशी माहिती, नाशिक ग्रामीण पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांनी दिली.

आदिवासी भागात अजूनही मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक आपल्या मुलींना अशा वसतिगृहात ठेवतात. वसतिगृहातदेखील मुलींसोबत असे प्रकार घडत असतील, तर या आदिवासी भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उभा ठाकतो आहे. तसेच शिक्षणाच्या नावाखाली, परिसरात आलेल्या पर्यटकांसमोर आपल्याच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना बळजबरीने नाचवण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा