नाशिक, ९ सप्टेंबर २०२०: सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. याचा परिणाम शिक्षण पद्धतीमध्येही पाहायला मिळाला आहे. शिक्षण शाळेत न जाता घराच्या घरीच घेता येणं शक्य झालं आहे. परंतु ज्यांची ऑनलाईन शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही त्यांचे काय? परिस्थिती अभावाने ऑनलाईन शिक्षणाचा लाभ न घेता येण्यामुळे एका मुलीने आपले जीवन संपवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिकमध्ये राहणाऱ्या बच्छाव कुटुंबीयांची आर्थिक स्थिती अत्यंत बेताची असून, घरात एकच मोबाईल असून शिकणारे भावंडे तीन आहेत. त्यातच रेवतीचे बारावीचे महत्वाचे शैक्षणिक वर्ष. ऑनलाईन अभ्यासाला बसण्यासाठी मोबाईल मिळत नव्हता.आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव रेवती संजय बच्छाव असून ती सटाणा महाविद्यालय बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे. तिचे आई वडील हे दोघेही मजुरी करतात. आर्थिक स्थिती अगदी बेताची असून जे कमवणार तेच खाणार असं असताना तिन्ही मुलांच्या शिक्षणासाठी मोबाईल कुठून आणणार हा प्रश्न त्यांना पडला होता.
तसेच रेवतिचे बारावीचे वर्ष हे अत्यंत महत्त्वाचे वर्ष होते. तिला ऑनलाईन अभ्यासाला बसण्यासाठी मोबाईल मिळत नसे. आणि मोबाईल मिळत नसल्याने अभ्यास अपूर्ण राहून जात असे. याच भितीपोटी तिने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली शासन आणखी किती बळी घेणार आहे असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते दिनेश बच्छाव यांनी केला असून, शासनाने तातडीने शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे