नवी दिल्ली, २६ सप्टेंबर २०२३ : राजधानी दिल्लीत चोरीची खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चोरट्यांनी जंगपूरा येथील ज्वेलरी शोरुम फोडून हा गुन्हा केला. घराचे छत कापून चोरट्यांनी सुमारे २५ कोटी रुपयांचे दागिने लंपास केले आहेत, चोरट्यांनी दिल्लीतील जंगपूरा भागात असलेल्या शोरुमला लक्ष्य केले. चोरट्यांनी शोरुमची भिंत तोडून प्रवेश केला. त्यांनी येथून सोने, हिरे आणि दागिने चोरुन पळ काढला. सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
शोरुम मालकांने सांगितले की, आम्ही रविवारी दुकान बंद केले. सोमवारी दुकानाला साप्ताहिक सुट्टी होती. आज आम्ही दुकान उघडल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली, असे ज्वेलर्स दुकानांचे मालक संजीव जैन यांनी सांगितले. दुकान मंगळवारी सकाळी उघडले तेव्हा संपूर्ण दुकानात धूळ होती. स्ट्राॅंग रुमच्या भिंतीला छिद्र पडले होते. चोरट्यांनी सर्व दागिने लंपास केले आहेत. दुकानात सुमारे २० ते २५ कोटी रुपयांचे दागिने होते. सीसीटीव्हीचीही मोडतोड करण्यात आली आहे, असेही जैन यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर