नवी दिल्ली, २० फेब्रुवरी २०२१: भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे. ध्रुवस्त्र म्हणजेच हेलिना अँटी-टँक क्षेपणास्त्राची चाचणी पूर्ण झाली आहे. आता हे क्षेपणास्त्र सैन्यात दाखल होण्यासाठी तयार आहे. अलीकडील चाचणीत, त्याने अत्यंत अचूकतेने त्याचे लक्ष्य नष्ट केले. लवकरच हे सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये तैनात केले जाऊ शकते. एचएएल रुद्र आणि एचएएल लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरमध्येही याचा वापर केला जाईल. भारतीय सैन्याच्या या अचूक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राबद्दल जाणून घेऊया …
शूट अँड फॉर्गेट, हे आर्मीच्या नवीन क्षेपणास्त्र ध्रुवस्त्रचे ब्रीदवाक्य आहे. भारत निर्मित ध्रुवस्त्र क्षेपणास्त्र प्रति सेकंद २३० मीटर वेगाने कार्यरत आहे. म्हणजे ताशी ८२८ किलोमीटर. हा वेग इतका आहे की डोळ्यांची पापणी लवण्या आधीच हे क्षेपणास्त्र शत्रूचा सर्वात मोठा टँक देखील नष्ट करू शकते. ध्रुवस्त्रची रेंज ५०० मीटर ते ४ किलोमीटर पर्यंत आहे. ध्रुवस्त्र क्षेपणास्त्राचे जुने नाव नाग क्षेपणास्त्र होते.
भारतीय सैन हे ध्रुवस्त्र क्षेपणास्त्र ‘ध्रुव हेलिकॉप्टर’मध्ये तैनात करेल. या क्षेपणास्त्राने सज्ज झाल्यानंतर, ध्रुव एक मिसाईल अटॅक हेलिकॉप्टर होईल. जेणेकरून आवश्यक असल्यास, शत्रूला धूळ चारण्यास उपयोगी पडेल.
ध्रुवस्त्र क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि लष्करासाठी ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे. आता भारताला अँटी-टँक गाईडेड क्षेपणास्त्रासाठी इतर देशांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.
डीआरडीओच्या म्हणण्यानुसार, ध्रुवस्त्र ही तिसर्या पिढीतील ‘शूट अँड फॉर्गेट’ अँटी-टँक मिसाईल (एटीजीएम) प्रणाली आहे, जी आधुनिक लाईट वेट हेलिकॉप्टरवर स्थापित आहे. ध्रुवस्त्र क्षेपणास्त्र सर्व हवामानात हल्ले करण्यास सक्षम आहे. तसेच, ते दिवसा किंवा रात्री सुद्धा दागले जाऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे