नवी दिल्ली, १४ फेब्रुवारी २०२३ :दिल्लीतील श्रद्धा हत्याकांड प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. आता श्रद्धासारखेच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीत समोर आले आहे. पोलिसांना मुलीचा मृतदेह ढाब्यावरील फ्रीजमध्ये आढळून आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतले असून, या प्रकरणाची दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कश्मिरे गेट ISBT जवळ एका कारमध्ये मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपीने मृतदेह मित्राळ गावातील ढाब्याच्या फ्रीझरमध्ये लपवून ठेवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे वय सव्वीस वर्षे असून, पोलीस त्याची चौकशी करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गेहलोत असे आरोपीचे नाव असून, मुलीची हत्या केल्यानंतर त्याने मृतदेह ढाब्याच्या फ्रीजमध्ये लपवून ठेवला होता. दरम्यान, पोलिसांनी फ्रीजमधून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे असून आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, यापूर्वी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाचा प्रियकर आफताबवर तिची हत्या केल्याचा आरोप आहे. आफताबने गेल्या वर्षी १८ मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडा मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. दरम्यान, पोलिसांनी आफताबला अटक केली असून त्याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.