श्रावण मासारंभ

पुणे, २९ जुलै, २०२२: हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना म्हणजे श्रावण. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा आणि सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्याना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे.

श्रावणात प्रामुख्याने नागपंचमी, षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती, त्रयोदशीला नरहरी सोनार जयंती, तर श्रावणी पौर्णिमेला नारळी पौर्णिमा आणि रक्षा बंधन असते.
नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा केली जाते. या दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी कोळी लोक समुद्राची पूजा करतात. समुद्राला नारळ वाहून मासेमारीला सुरुवात करतात. पावसाळ्यात बंद असलेली मासेमारी या दिवशी सुरु होते. त्यामुळे कोळी लोकांच्या दृष्टीने हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो. रक्षाबंधनला बहीण भावाच्या हातात राखी बांधते. त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे नाव पडले असावे.
श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. हा सोहळा मोठ्या दिमाखात आणि आनंदाने साजरा होतो. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात.

श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या असे नाव आहे. संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात. त्याची पूजा करुन त्याचे मनोमन आभार आणि साथ देण्याची कबूली देतात.

वास्तविक आषाढातील पानगळी नंतर श्रावणात झाडाला नवी पालवी फुटते. या मुळे श्रावण महिन्याला जास्त महत्व आहे. शेतकरी जोमाने कामाला लागतात. आणि प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा मानला जातो. या काळात मांसाहार करण्यास वर्ज्य मानला जातो. याचे शास्त्रीय कारण असे की मासे, कोंबड्या, बकरी यांचा हा प्रजननाचा काळ असतो. या काळात त्यांचे योग्य प्रजनन व्हावे, यासाठी मांसाहार बंद केला जातो.

आजपासून श्रावण मासारंभाला सुरुवात झाली असून, तुम्ही हा श्रावण महिना आनंदाने आणि उत्साहाने घालवा, आणि धमाल करा…

न्यूज अनकट प्रतिनिधी – तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा