श्रावण सरी पिकांसाठी वरदान – शेतकरी दत्तात्रय सातव

2

लोणी काळभोर, दि. ११ ऑगस्ट २०२०:  पूर्व हवेलीत पावसाच्या श्रावण सरीचा जोर वाढल्याने त्याचा फायदा बाजरी, मका, कडवळ, या पिकाला होत असल्यामुळे, हा पाऊस वरदान ठरत आहे. हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी काळभोर, आळंदी, थेऊर, कुंजीरवाडी, कोलवडी, साष्टे, या गावांमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने बाजरीची कणसे फुलोऱ्यात आली असल्यामुळे शेतकरी आनंदात दिसत आहेत.

जून महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला होता व एक महिन्याच्या विश्रांतीनंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाल्याने खरीप हंगामातील सर्वच पिके जोमात आली आहेत. तरी अजूनही या भागातील ओढ्या नाल्यांना पूर आला नाही व त्यातच पावसाने एक महिना दडी मारली होती. सध्या विविध पिकांना पावसाची नितांत गरज आहे व सोमवारी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. बाजरीचे पीक हमखास येणार असल्याने एका बाजूला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. धान्याबरोबरच वैरणही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आहे. एकंदरीत या वर्षी बाजरीचे पीक १००% हाती लागणार असल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच हवेली तालुक्याच्या पूर्व भागात पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी आनंदित आहेत. मागील एक महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त होता परंतु मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने पूर्व हवेलीतील शेतकरी आनंदित आहे.

जून महिन्यात बाजरी पेरणी झाल्यावर जून दरम्यान चांगला पाऊस झाल्याने बाजरीची उगवण चांगली झाली होती. परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे आम्ही चिंतेत होतो. सध्या मागील दहा बारा दिवस परत पाऊस सुरू झाल्याने पिकाला जीवदान मिळाले आहे. असे शेतकरी दत्तात्रय सातव यांनी सांगितले आहे.

 

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा