फलटण, सातारा २३ नोव्हेंबर २०२३ : श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी हा श्री पांडुरंग पालखी सोहोळा कार्तिक वद्य ३, गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी, फलटण येथील जिती पुलावरील श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालय प्रांगणात एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावणार असून कार्तिक वद्य ४, शुक्रवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी सोहोळा लोणंद येथील मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या माध्यमातून सन २०१४ पासून श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी निघणारा श्री पांडुरंग पालखी सोहोळा, यावर्षी मित्ती कार्तिक शु|| १५, सोमवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता श्री विठ्ठल मंदिर सभामंडप येथून आळंदी कडे प्रस्थान ठेवणार असून कार्तिक वद्य ९, बुधवार दि. ६ डिसेंबर रोजी सोहोळा आळंदी येथे पोहोचणार आहे. सदर सोहळा सन २०१४ मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे तत्कालीन अध्यक्ष आण्णासाहेब डांगे यांनी ह.भ.प. विठ्ठल महाराज वासकर यांच्या अधिपत्याखाली सुरु केला. हा सोहळा वासकर दिंडी समवेत श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यास श्री क्षेत्र आळंदी येथे तेंव्हा पासून प्रतिवर्षी जातो.
श्री क्षेत्र पंढरपूर ते श्री क्षेत्र आळंदी हा श्री पांडुरंग पालखी सोहोळा कार्तिक वद्य ३, गुरुवार दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी धर्मपुरी येथून निघून सकाळच्या विसाव्यासाठी राजुरी व न्याहरी साठी बरड येथे, तर दुपारचा नैवेद्य व भोजन विश्रांतीसाठी सकाळी ११.३० वाजता पिंप्रद आणि दुपारी ३.३० ते ४ या वेळेत दुपारच्या विसाव्यासाठी विडणी येथे थांबणार असून रात्री शेती शाळा येथे सोहोळयाचा मुक्काम आहे.सोहोळया समवेत अंदाजे ५ ते ७ हजार दिंडीकरी वारकरी असतात.
आळंदी – पंढरपूर – मोहोळ राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम सध्या वेगात सुरु असल्याने या मार्गावरुन हा सोहोळा जाताना कोणतीही अडचण येऊ नये, या दृष्टीने प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आज तहसील कार्यालयात प्रशासकिय अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा घेऊन विविध विभागांना व्यवस्थेबाबत स्पष्ट सूचना आणि संपूर्ण व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश दिले. तसेच येथील प्रभू श्रीराम रथोत्सव व रामरथ यात्रा मार्गशीर्ष शु|| १ प्रतिपदा, बुधवार दि. १३ डिसेंबर रोजी असल्याने त्याबाबत व्यवस्थेची चर्चा व आढावा या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीस तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड, वीज वितरण कंपनीचे शहर सहाय्यक अभियंता प्रकाश देवकाते, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कोंडके, पोलिस अधिकारी, महसूल मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, मार्गावरील गावचे सरपंच आणि प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : आनंद पवार