साताऱ्याच्या मलवडी येथील श्रीमल्हारी म्हाळसाकांताचा रथोत्सव उत्साहात पार

सातारा २३ डिसेंबर २०२३ : येळकोट येळकोट जयमल्हार, लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलं अशा जयघोषात सातारा जिल्ह्यातल्या मलवडी येथील श्रीमल्हारी म्हाळसाकांताचा रथोत्सव उत्साहात पार पडला. सालाबाद प्रमाणे भंडारा खोबऱ्याची उधळण करीत भक्तांच्या अलोट गर्दीत हा वार्षिक रथोत्सव साजरा होत असतो. या वर्षी देखील मोठ्या संख्येने भावीकानी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केलेली पहायला मिळाली.

धुपारती झाल्यावर श्रींचे मुखवटे मानकरी, सालकरी, पुजारी, वाघ्या-मुरळी यांच्या उपस्थितीत रथावर नेण्यात आले. मुखवटे घेऊन जात असताना हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येकजण मंदिराच्या सज्जा समोर गर्दी करत असतो. मुखवटे नेतेवेळी भाविकांनी एकच जल्लोष केला. मंदीराच्या समोर असलेल्या सज्जावरुन भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उधळण करण्यात आली.

श्रींची आरती झाल्यावर रथाची ग्रामप्रदक्षिणा सुरु करण्यात आली. काही अंतर गेल्यावर श्री महालक्ष्मीचा रथ ग्रामप्रदक्षिणेत सहभागी झाला. देवाची घोडी, सनई-हलगीचे ताफे तसेच वाद्यवृंदांच्या सहभागाने रथाची ग्रामप्रदक्षिणा पार पडली. यावेळी भाविकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.

न्युज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा