धाराशिवच्या परंडा पोलिसांनी दाखविली कर्तव्यदक्षता, डॉक्टरांना दिली ऑपरेशन वेळी सुरक्षा

परंडा, धाराशिव २३ डिसेंबर २०२३ : धाराशिवच्या परंडा पोलिसांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षता सध्या परांडा शहरात कौतुकाचा विषय ठरली आहे. घटनेची हकीकत अशी आहे की, काल शुक्रवारी मोरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल, कुर्डूवाडी रोड, परंडा येथे अत्यावश्यक सेवेमध्ये रात्री ११ ते ११.३० च्या दरम्यान एक ऑपरेशन सुरू होते. त्यावेळी हॉस्पिटल बाहेरच्या रस्त्यावर काही अज्ञात जमावाचे भांडणे सुरू झाले. त्या पळापळीत दगडफेकीच्या भीतीने ऑपरेशन करणाऱ्या सर्जन आणि भूलतज्ञ यांच्या गाडीचे ड्रायव्हर घाबरले. त्यांनी हॉस्पिटलमध्ये घाबरून फोन केला की बाहेर गोंधळ चालू आहे आणि गाडीवर दगडफेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑपरेशन करणारे डॉक्टर आणि स्टाफ घाबरून गेला.

तेवढ्यात बाहेर एका ग्रामीण भागातील रुग्णाला अचानक छातीत दुखून आले आणि तो चक्कर येऊन पडल्यामुळे त्याला काही लोकांनी मोरे हॉस्पिटल येथे आणले. त्याचवेळी त्या रुग्ण आणि नातेवाईका बरोबर या अज्ञात गोंधळ घालणाऱ्या जमावा मधील काही व्यक्ती दवाखान्यामध्ये त्या रुग्णासोबत शिरले. कदाचित त्या मॉब मधील सदविचारी व्यक्तींचा हेतू, त्या रुग्णाला वाचवण्याचा असू शकतो. परंतु या गोंधळात सुरु असलेले ऑपरेशन मध्येच थांबवणे शक्य नव्हते. अशावेळी भूलतज्ञ यांनी पोलीस स्टेशन परंडा येथे फोन लावला आणि त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ पोलीस गाडी पाठवून जमावाचा तो गोंधळ शांत केला आणि हॉस्पिटल मध्ये शिरलेल्या लोकांनाही त्यांनी गोडी गुलाबी ने बाहेर काढले.

या नंतर स्वतः दोन कॉन्स्टेबलनी ऑपरेशन थिएटर मध्ये थांबुन डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना धीर दिला तसेच सर्व कार्य संपेपर्यंत ते हॉस्पिटलमध्येच थांबले. ऑपरेशन संपल्यानंतर त्या दोन्ही डॉक्टरांच्या गाड्या जाईपर्यंत पोलीस स्टाफ मोरे हॉस्पिटल येथेच उपस्थित होता. अशाप्रकारे त्यांनी कर्तव्यतत्परता दाखवल्यामुळे हॉस्पिटल मधील सर्वच रुग्ण, त्यांचे नातेवाईक, तज्ञ डॉक्टर्स, हॉस्पिटल स्टाफ यांना मोठा दिलासा मिळाला. योग्य वेळी धावून आलेल्या या देवदूतांमुळेच समाज रक्षक पोलीस दल यांच्या ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्याची प्रचिती आली’ अशी भावना प्रत्यक्षदर्शींची होती.

संविधानाचे अधिकार प्रामाणिक, दक्ष, संवेदनशील, संस्कारक्षम व्यक्तींच्या हाती गेले तर कायदा सुव्यवस्थेने समाजातील गरीब, वंचित, पीडित घटक सुखी होईल. आज पोलीस दलाने अथक परिश्रम घेऊन रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून गुन्हेगारी जगतावर जो वचक ठेवला आहे, त्यामुळे आम्ही सर्व कुटुंबीय रात्री शांततेची झोप आपल्या मुलाबाळांसोबत घेतो आहोत. मात्र हीच दक्ष सतर्क यंत्रणा ऊन, वारा, पाऊस, प्रकाश, अंधार या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहून निस्वार्थ भावनेने कर्तव्यनिष्ठ समाजसेवा, देशसेवाच करत आहेत. याचा आम्हा भारत देश बांधवांना अभिमान आणि गर्व आहे . अशा सर्व खाकी वर्दीतील देवदुतांना, समाज रक्षक दल बंधू-भगिनींना मानाचा मुजरा, सॅल्यूट, जय हिंद !

-डॉ.आनंद गोरख मोरे, वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय परंडा, धाराशिव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा