नवी दिल्ली, १४ फेब्रुवारी २०२३ :भारतीय क्रिकेट टीमधील सलामीचा फलंदाज शुभमन गिलच्या शानदार खेळीची आयसीसीने दखल घेतली आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अविस्मरणीय कामगिरीमुळे ‘ICC प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तर दुसरीकडे महिला क्रिकेटमधून इंग्लंडच्या १९ वर्षाखालील महिला संघाची कर्णधार ग्रेस स्क्रीवन्स या पुरस्काराची मानकरी ठरली.
शुभमन गिलने न्यूझिलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात रेकॉर्ड ब्रेकिंग खेळी करताना टीम इंडियाला धावांचा डोंगर उभारून दिला. यासोबतच श्रीलंकेविरुद्ध खेळताना देखील गोलंदाजांची धुलाई करताना विक्रमी धावा केल्या. त्याने जानेवारीमध्ये ५६७ धावा केल्या. यामध्ये तीन शतकांपेक्षा जास्त धावसंख्येचा समावेश होता.
तर न्यूझीलंडविरुद्ध रोमहर्षक विजयात गिलने शानदार द्विशतक झळकावले होते. त्याने अवघ्या १४९ चेंडूंत २८ चौकारांच्या मदतीने नाबाद २०८ धावा केल्या. एक आश्चर्यकारक पराक्रम देखील त्याने केला आहे. केवळ एकदिवसीय फॉर्मेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.
- गिल म्हणाला…
याबाबत बोलताना गिल म्हणाला, आयसीसी पॅनेल आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांनी ICC पुरुष खेळाडू म्हणून निवडल्याबद्दल मला आनंद झाला आहे. जानेवारी हा माझ्यासाठी विशेष महिना होता आणि हा पुरस्कार जिंकल्याने तो आणखी संस्मरणीय झाला आहे. या यशाचे श्रेय मी माझ्या सहकाऱ्यांना आणि प्रशिक्षकांना देतो ज्यांनी एक खेळाडू म्हणून मला पाठिंबा दिला.
पुढे तो म्हणाला, तुमच्या कामगिरीची ओळख मिळणे नेहमीच आनंददायी असते. आम्ही घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषकासारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेत प्रवेश करत आहोत त्यामुळे या खेळीतून मला खूप आत्मविश्वास मिळेल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.