सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

जानेवारी महिन्यात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेतील साजरे होणारे धार्मिक, सांस्कृतिक वेगळेपण देशभरात प्रसारित होण्याची आवश्यकता आहे. जाती पंथ, भेदभाव विरहित साजरा होणाऱ्या सोलापूरच्या या गड्डा यात्रेचे देशातील सर्व इतर यात्रेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण, वेगळेपण आहे. हे वेगळेपण तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दिव्य कार्याचा प्रसार करीत सांस्कृतिक, अध्यात्मिक महती देशभरात होण्यासाठी चार दिवसीय यात्रेचे थेट प्रक्षेपण डी.डी सह्याद्रीवर करण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.

संसदीय अधिवेशनात दरम्यान 377 अन्वये तसेच केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी हि मागणी केली. यावेळी तत्परतेने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत दाखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. येणाऱ्या जानेवारी महिन्यातील गड्डा यात्रेचे चित्रीकरण, प्रसारण राष्ट्रीय डि.डि. वाहिनीवर करण्यात येण्याबाबत सकारात्मकता दर्शविली.

सोलापूर नगरी हि १२ व्या शतकात श्री सिद्धेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेली योगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी घेतलेल्या जिवंत समाधीमुळे सोलापूर हि योगभूमी, तपोभूमी म्हणून दक्षिण भारतात परिचित आहे. सुमारे ९०० वर्षांपासून प्रतिवर्षी मकर संक्रांतीस जानेवारी महिन्याच्या १२ ते १५ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या ४ दिवसीय काळात गड्डा यात्रा भरते. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात. १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांच्या समकालीन श्री सिद्धेश्वरांनी ६८ हजार वचने लिहिली. ४००० शिवशरण भक्तांसह तलावाची निर्मिती केली. या तलावाच्या मधोमध जिवंत समाधी घेतली.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रा काळात सर्वाधिक आकर्षण म्हणजे सर्व संप्रदायांचे मानकरीसहित पांढरा शुभ्र बाराबंदी वेश परिधान करून श्री सिद्धेश्वरांच्या योगडांदाची प्रतिकृती असलेले सात नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते. जे पाहणे अविस्मरणीय अत्यंत विलक्षणीय असते. विशेष म्हणजे १२ व्या शतकात श्री सिद्धेश्वरांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करून आदर्श समाज निर्मितीसाठी महान कार्य केले. त्यामुळे या महान संतांचे कार्य, विचार व अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा देशभरात प्रसारित व्हावा. हि गड्डा यात्रा देशभरात माहित व्हावी यासाठी चार दिवसीय यात्रेचे थेट प्रक्षेपण डी.डी सह्याद्रीवर करण्याची मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा