मुंबई, १ एप्रिल २०२३: शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचा मेसेज आला असून, दिल्लीतील पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याप्रमाणेच ठार मारण्याची धमकी दिलय. धमकी मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी याबाबत मुंबई पोलिसांकडं तक्रार केलीय. तक्रारीनंतर मुंबई पोलीस या प्रकरणांच्या तपासात गुंतले आहेत.
राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर हा धमकीचा मेसेज आल्याचं सांगण्यात येतंय. शुक्रवारी रात्री संजय राऊत यांच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला, ज्यामध्ये आरोपीने लिहिलं की, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य आहे. लॉरेन्स बिश्नोईने तुम्हाला मारायला सांगितलंय. तुम्हाला दिल्लीतील सिद्धू मुसेवालाप्रमाणे मारलं जाईल, असं धमकीच्या संदेशात स्पष्ट लिहिलं होतं.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी संजय राऊत यांना धमकावल्याबद्दल शिंदे सरकारवर निशाणा साधला. अंबादास दानवे म्हणाले की, शिंदे सरकारने संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेतलीय. आपल्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय, मात्र सरकार त्याचा विचार करत नाही. आता देशातील कुख्यात टोळीने त्यांना जीवं मारण्याची धमकी दिलीय. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवावी, अशी आमची (अंबादास दानवे) मागणी आहे.
मला धमकीचा मेसेज आला असून मी पोलिसांना कळवलंय, असं संजय राऊत यांनी सांगितलं. या धमक्यांना मी घाबरत नसल्याचं ते म्हणाले. माझ्यासोबत असं घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. हे सरकार आल्यानंतर आमची सुरक्षा कमी करण्यात आली, पण आम्ही त्याबद्दल फारसं बोललो नाही. मुख्यमंत्र्यांच्या मुलाने माझ्यावर गुंडा मार्फत हल्ला करण्याचा कट रचला, याबाबत मी पत्र लिहिताना हा स्टंट असल्याचं म्हटलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड