टोकियो, २७ जुलै २०२१: टोकियो ऑलिम्पिक -२०२० मध्ये भारतासाठी रौप्यपदक जिंकणारी मीराबाई चनू मायदेशी परतलीय. विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या आश्चर्यकारक स्वागताबद्दल वेटलिफ्टर चनू यांनी आभार मानले आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये (४९ किलो गटात) रौप्य पदक जिंकणार्या मीराबाई चानू यांचं पदक सुवर्णात रूपांतरित होऊ शकते, अशी माहिती मिळालीय.
वास्तविक, चिनी खेळाडू होऊ झिऊई वर डोपिंगचा संशय आहे. टोकियोमध्ये भारतीय गटात अशी चर्चा आहे की, होऊ झिऊईची चाचणी घेतली जातेय आणि पुढं काय होतं ते पाहणं बाकी आहे. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य याबाबत फारसे बोलत नाहीत. होऊ झिऊई आज आपल्या देशात परत येणार होती, पण तिला राहण्यास सांगितलं गेलंय. ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच असं घडलं आहे जेव्हा डोपिंग मध्ये फेल झाल्याबद्दल एखाद्या खेळाडूचं पदक काढून घेण्यात आलं.
टोकियो ऑलिम्पिकमधील महिलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये (४९ किलो) मीराबाईचं पदक सुवर्णात बदललं तर ऑलिम्पिक इतिहासातील वैयक्तिक स्पर्धेतील हे भारताचं दुसरं सुवर्णपदक असंल. अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने भारताला पहिलं सुवर्णपदक (बीजिंग २००८) दिलं.
मीराबाई चनूने ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदकाची २१ वर्षांची प्रतीक्षा संपविली आहे. यापूर्वी कर्डम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक २००० मध्ये देशासाठी वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. मीराबाई घरी परतल्या आहेत. त्यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिलीय.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनी मीराबाई यांच्याशी थेटपणे संवाद साधला. मणिपूर सरकारने त्यांना एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे