कोपरगाव, १३ जुलै २०२३ : राष्ट्रवादीत बंडाळी होत असताना परदेशात असलेले कोपरगावचे आमदार आशुतोष काळे हे बुधवारी भारतात परतताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला पोहचले. शरद पवार यांना दैवत संबोधत आ.काळे यांनी पाठिंबा मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिला आहे. भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक हे याच मतदारसंघातून २०२४ च्या विधानसभेची तयारी करत असल्याने कोपरगावचे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आमदार आशुतोष काळे यांची पहिलीच टर्म असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्यांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानचे अध्यक्षपदही दिले होते. अजित पवारांच्या बंडाच्या वेळी आ. काळे आपल्या कुटुंबासह परदेशात होते. ते साहेबांसोबत जातील की दादासोबत याबाबत विविधांगी चर्चा होती. मात्र देशात परतताच ते देवगिरीवर पोहचले. तिथे त्यांनी दादांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिला.
कोपरगावात काळे-कोल्हे हे राजकीय प्रतिस्पर्धी कुटुंब आहेत. राज्यात भाजप-शिंदे-पवार असे सत्ता समीकरण उदयास आले आहे. आशुतोष काळे हे आमदार असले तरी भाजपचे युवा नेते विविक कोल्हे हे आगामी विधानसभेसाठी दंड थोपटून तयार आहेत. काळे-कोल्हे यांचे सूर जुळणे कठीण असल्याची चर्चा असून, काळे यांच्या भूमिकेने कोपरगावची राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर