‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा OTT रिलीज नंतर चित्रपटगृहात रिलीज होणारा पहिला चित्रपट ठरला.

मुंबई ४ जुन २०२३ : खरं तर चित्रपट आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होतात, मग ओटीटीवर येतात. पण हा पहिलाच चित्रपट आहे, जो ओटीटीच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येत आहे. लोकप्रिय अभिनेते मनोज बाजपेयी यांची प्रमुख भूमिका असेलला ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट आता थिएटरमध्येही प्रदर्शित झाला आहे. OTT नंतर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे.

ZEE 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २३ मे रोजीच हा चित्रपट स्ट्रिम झाला. सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर या चित्रपटाबद्दल प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपटाचे निर्माते बऱ्याच दिवसांपासून हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्याच्या विचारात होते. आता हा चित्रपट दिल्ली, मुंबई आणि यूपीसह देशातील पाच राज्यांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

OTT नंतर चित्रपट सिनेमागृहात का पाहावा? या प्रश्नावर मिडियाला उत्तर देताना मनोज बाजपेयी म्हणाले की, हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करावा, अशी मागणी सोशल मीडियावर लोकांकडून मोठ्या प्रमाणात होत होती. त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर केला गेला आहे. आता आम्ही त्यांना मोठ्या पडद्यावरही चित्रपटाचा आनंद घेण्याची संधी देत ​​आहोत. तसेच चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्याने एक चांगला संदेश आपल्याला मिळतो. आमचे हे पाऊल लोकांची विचार करण्याची पद्धत बदलेल. आम्हाला असे वाटते की, या दोन्ही माध्यमांनी म्हणजेच ओटीटी आणि थिएटर यांनी एकमेकांशी स्पर्धा न करता एकमेकांसोबत काम केले पाहिजे.

पुढे आणखी बोलताना मनोज म्हणाले,
चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतोय हे या चित्रपटापुढे दुय्यम ठरते, कारण जेव्हा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला तेव्हा त्याच्या कमाईच्या आकड्यांबद्दल कोणीही बोलले नाही. आता हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपट किती कमाई करतो याकडे प्रेक्षक लक्ष देत नाहीत, त्यांना फक्त चित्रपटातील बारकावे पाहायचे असतात. आता लोक त्यांच्या अभिनयातील सर्जनशीलता आणि कॅमेरा वर्कबद्दल बोलतील. चित्रपटाचे कलेक्शन किती आहे, या सगळ्याचा विचार करणे निर्माते आणि वितरकांचे काम आहे.

‘सिर्फ एक बंदा काफी है’ या चित्रपटावरून सुरुवातीला वाद झाला, आसाराम ट्रस्टच्या लोकांनी यावर आक्षेप घेतला होता. या चित्रपटात एक १६ वर्षांच्या मुलीवर एका भोंदू बाबाने बलात्कार केल्याचे दाखवण्यात आले आहे. चित्रपटात दिसणाऱ्या बाबाचे रूप हुबेहुब आसारामसारखे आहे. आसाराम बापू ट्रस्टच्या वकिलांनी म्हटल्यानुसार, या चित्रपटामुळे त्यांच्या क्लायंटची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणीही त्यांच्याकडून करण्यात आली होती. या चित्रपटात मनोज बाजपेयी यांनी वकील पी.सी. सोलंकीची भूमिका वठवली आहे. प्रत्यक्षातदेखील पी सी सोलंकी नावाच्या वकिलांनीच आसाराम विरोधात खटला लढवला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा