औरंगाबाद मधील धानोरा गावात कामगारांचे ठिय्या आंदोलन

औरंगाबाद, दि. २९ मे २०२०: सध्या राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यात औरंगाबाद रेड झोन मध्ये मोडले जाते. त्यामुळे उत्पन्नाची सर्व साधने बंद पडलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये एकमेव उत्पन्नाचे साधन म्हणजे मजुरी. सध्या ते काम सुद्धा बंद असल्याने मजुरांची आर्थिक कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद मधील धानोरा या गावात आता मजुरांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. हे गाव फुलंबरी तालुक्यातील आहे. ग्रामपंचायतीच्या पारासमोर बसून या कामगारांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

येथे बसलेल्या कामगारांची अशी मागणी आहे की, ग्रामीण भागातील सर्व रोजगार बंद झाले आहेत. आमच्याकडे कोणत्याही प्रकारची उत्पन्नाची साधने आता राहिलेली नाहीत. उत्पन्न नसल्याने आर्थिक अडचणी जाणवू लागल्या आहेत त्यामुळे सर्व बाजूने कोंडी होण्यास सुरुवात झाली आहे.

हे कामगार कुदळ, फावडी, घमेली असे आपल्या कामाची अवजारे घेऊन आंदोलनात बसले आहेत. कामगार म्हणताहेत की गेल्या एक महिन्यापासून आम्ही कामाच्या प्रतिक्षेत आहोत. प्रशासनाने आम्हाला कामासंबंधी फॉर्म भरून देण्यास सांगितले होते आम्ही इथे फॉर्म देखील भरून दिले. परंतु सरकारी अधिकारी आम्हाला कोणताही प्रतिसाद देत नाहीत. एका अधिकाऱ्याकडे गेलो कि तो दुसऱ्या अधिकाऱ्याकडे पाठवत आहे.

जवळपास ३०० मजूर सध्या या गावात बेरोजगार आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत काम उपलब्ध करून द्यावे अशी मागणी ते करत आहेत. मात्र या आंदोलनाच्या ठिकाणी हे सर्व मजूर दाटीवाटीने बसले आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरणे यांसारख्या नियमांना धाब्यावर बसवत हे आंदोलन सुरू आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा