वंदेभारत एक्सप्रेसचा स्लीपर कोच व्हर्जन लवकरच सुरू होणार, मुंबईतून धावू शकते पहिली स्लीपर कोच

मुंबई, २१जुलै २०२३ : वंदेभारत एक्सप्रेसचा स्लीपर कोच व्हर्जन तयार करण्याचे काम सुरू आहे. देशाची पहिली वंदेभारत तयार करणाऱ्या चेन्नईच्या आयसीएफ फॅक्टरीतच वंदेभारतचे स्लीपर कोच श्रेणीचे मॉडेल तयार केले जात आहे. या गाडीची आता देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतून सुरु करण्याची योजना आहे. त्यामुळे मुंबईतून पहिली स्लीपर कोच व्हर्जन गाडी सुरु होऊ शकते.

देशाची पहिली सेमी हायस्पीड वंदेभारत ट्रेन दिल्ली ते वाराणसी मार्गावर सुरु करण्यात आली. आतापर्यंत देशातील विविध २५ मार्गावर वंदेभारत सुरु करण्यात आल्या आहेत. वंदेभारत ही इंजिन विरहीत वीजेवर धावणारी लक्झरी ट्रेन असून तिला आतापर्यंत चेअरकारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तिचा फायदा होत नाही. त्यामुळे वंदेभारतचे स्लीपर कोच व्हर्जन तयार केले जात आहे.

वंदेभारतचा स्लीपर कोच प्रोटोटाईप चेन्नईतील इंटिग्रेल कोच फॅक्टरीत तयार केला जात आहेत. या वंदेभारत स्लीपर कोच व्हर्जनला सध्या प्रवाश्यांच्या गर्दीच्या मार्गावर चालविण्याची योजना आहे. मुंबई ते दिल्ली मार्गावर सध्या पश्चिम रेल्वेच्या तेजस एक्सप्रेसचा स्लीपर कोच चालविण्यात येत आहे. त्याला आता वंदेभारत स्लीपर कोचमध्ये वर्ग केले जाऊ शकते.

मुंबई ते दिल्ली दरम्यान प्रवासाला सध्या १६ तास लागतात. आता हा प्रवास १२ तासांवर आणण्याची तयारी सुरु आहे. त्यासाठी रेल्वे रुळांची क्षमता वाढविण्याच्या कामाला २०१७-१८ मध्ये मंजूरू मिळाली होती. मुंबई सेंट्रल ते नागदा या ६९४ किमी अंतराचे काम सुरु आहे. बडोदा आणि अहमदाबाद दरम्यान १०० किमी अंतरावर काम सुरु आहे, त्यासाठी ३,२२७ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. रुळांभोवती ५७० किमीचे पोलादी कुंपण आणि १९५ किमीची संरक्षक भिंत उभारण्याचेही काम सुरु आहे.

मुंबई ते अहमदाबाद ४७४ किमीचे कुंपणाचे काम झाले आहे. नागदा ते मथुरापर्यंत पश्चिम मध्य रेल्वे ५४५ किमीचे काम करत आहे, मथुरा ते पालीवल ८२ किमीचे काम उत्तर मध्य रेल्वे तर पालीवल ते दिल्ली ५७ किमीचे काम उत्तर रेल्वे करीत आहे. आयसीएफने ८६ वंदेभारत तयार करण्याचे कंत्राट मंजूर केले आहे. त्यातील ९ ट्रेन स्लीपर कोचच्या असतील. येत्या चार वर्षांत ४०० वंदेभारत सुरु करण्याची योजना आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा