छत्रपती संभाजीनगर १८ मार्च २०२४ : छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर क्रांतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ता तथा लघुउद्योजक याच्या डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना काल सायंकाळी साजापूर परिसरात घडलीय. या घटनेत मृत्युमुखी पडलेला व्यक्ती सचिन साहेबराव नरोडे, वय ३८ हा असून रा बालाजीनगर क्रांतीनगर साजापूर येथील आहे. मूळ गाव शिल्लेगाव तालुका गंगापूर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साजापूर बालाजी नगर येथे नरोडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत पाण्याच्या पाइपलाईनचे काम सुरु होते, कामाची पाहणी करत होते लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत सचिन नरोडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून गोळी घालण्यात आली यामध्ये तो जागीच मृत्युमुखी पडला. या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपयुक्त नितीन बगाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रविण पाथरकर, अशोक इंगोले, यांचासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कारवाई करण्यासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
सचिन नरोडे हा सामाजिक कार्यकर्ता आणि लघुउद्योजक होता सचिनच्या लघुउद्योगामुळे अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळाला होता मात्र शिक्षकाचा मुलगा असल्यामुळे होणारा अन्याय डोळ्यांना पाहून सहन होत नाही म्हणून तो वाळू तस्करीच्या विरोधात तक्रारी करत होता कदाचित वाळू तस्करीच्या विरोधात तक्रारी केल्यामुळे सचिनची हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे
वाळू तस्करांच्या विरोधात सचिनने यापूर्वी तक्रारी केल्यामुळे सचिन वर हल्ला झाला होता. यामध्ये सचिनची चार चाकी गाडी पूर्णपणे जाळून टाकण्यात आली होती त्यावेळी सचिन वाहनात नसल्यामुळे त्याचा जीव वाचला, मात्र यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्यामुळे तो जागीच गतप्राण झाला आहे एकूणच काय तर वाळू तस्करांमुळे त्याची हत्या झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे पोलीस प्रशासन या दृष्टीने तपास करून आरोपींना गजाआड करेल अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त केले जात आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आचारसंहिता सुरू होताच पहिला खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलीस प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलत नागरिकांना त्यांच्या जीवाची हमी देण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : संजय आहेर