… म्हणून ग्राहकांनी नियमित वीजबिले भरणे गरजेचे : विजय सिंघल

6

मुंबई, १६ फेब्रुवारी २०२३ :महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होत असल्याने अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय असून घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषीग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.

ते म्हणाले की, महावितरणसुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण स्वतः वीजनिर्मिती करत नाही किंवा कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ८० टक्के रक्कम ही वीजखरेदीवर खर्च होते. २०२१ -२२ या गेल्या आर्थिक वर्षात महावितरणने वीजखरेदीपोटी ६९,४७८ कोटी रुपये खर्च केले होते.

महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीजखरेदीचे पैसे देते व त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागवला जातो. वीजबिलांतून उत्पन्न मिळणे म्हणजे महावितरणचा श्वास चालू राहण्यासारखे आहे. त्यामुळे अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणकडे ग्राहकांनी वीजबिले भरणे हा एकमेव पर्याय आहे. दरम्यान, वीज ग्राहकांची बिलांची थकबाकी ७३,३६१ कोटींवर गेल्याने ग्राहकांनी वीजबिले भरणे अधिक गरजेचे झाले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा