…तर गोडाऊनमधून साखरेचा एक कण बाहेर पडू देणार नाही: राजू शेट्टीं

कोल्हापूर, ३ नोव्हेंबर २०२०: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षी पहिली उचल विनाकपात एकरकमी एफआरपी देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलीय. तसेच तोडणी वाहतुकीमध्ये ज्याप्रमाणे १४ टक्‍क्‍यांची वाढ करण्यात आली त्या प्रमाणेच शेतकऱ्यांना वाढलेला उत्पादन खर्च गृहीत धरून एकूण १४ टक्के वाढ हंगाम संपल्यानंतर देण्यात यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा साखर अडवून वाढीव रक्कम वसूल करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

कोल्हापुरात सोमवारी जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या १९ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी त्यांनी ऊस उत्पादकांना १४ टक्के वाढीव एफआरपी देण्याच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. गेल्यावर्षीच्या तुलनेत केंद्र सरकारने एफआरपी १०० रूपयांनी वाढवला आहे. परंतु, १४ टक्क्यानुसार एफआरपीची रक्कम ३८२ रुपयांनी वाढली पाहिजे. त्यामुळे केंद्र सरकारने किमान २०० रुपयांनी तरी एफआरपी वाढवावा.

ऊस तोडणी कामगारांनी आंदोलनाची हाक दिल्यानंतर काही नेत्यांनी पुढाकार घेतला, त्यांचा प्रश्न सोडवला. मग शेतकऱ्यांना भाव मिळावा म्हणून का कुणी पुढाकार घेत नाही? अशी टीका राजू शेट्टी यांनी नाव न घेता शरद पवारांवर केली आहे.

येत्या ५ नोव्हेंबरला देशभरातील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. आम्ही रस्त्यावर उतरून ठिकठिकाण रस्ता रोखून धरू. किमान दोन तास शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा