तुझ्या गोरेपणाला मी कायमच घाबरत आलेय
अनेकदा मी बिचकलेय
कैकदा तर दचकलेय…
ठाऊक आहे मला पक्कं
भांडवलदारांची प्रसाधनंही
कधीच मला गोरं करू शकत नाहीत
तुझ्यासारखं सुंदर दिसणं
नाहीच मला कधी शक्य…
पण, मग मी काय बाई नाही?
मला खात्री आहे तूही घाबरतेस गोरेपणाला
कारण तुझी मुलं मोठी होताहेत
ते मोठे होऊन पुरुष बनतील…
त्यांचं पौरुषत्व तुझ्यावर गाजवतील
तुला नाजूक म्हणून जपतील
नि, तुला पुन्हा गुलाम करतील…
मीही तुझ्यासारखीच घाबरतेय
कारण, माझीही मुलं मोठी होताहेत
त्यांचं पुरुष होणं मला टरकवतंय
ते काळे पुरुष बनतील म्हणूनही…
तू गोरी असूनही
तुला सोक काळेपणाचाच
माती खणून गट्टे पडलेले हात
तुला पहाडी वाटतात ठाऊकंय…
घामेजलेली छाती तुला आकर्षित करते
पण बलात्कारी ठरतो काळा पुरुषच
तू घाबरतेस सार्वजनिक न्यायाला
माझा काळा मुलगा मात्र बळी जातो…
आता मला सांग…
मग मी काय बाई नाही…?
तुझ्या मुलायम केसांची जाहीरात होते
मी केस जगावेत म्हणून वेण्या घालते
मालक तुझ्या केसांची बोली लावतो
नि, मला केसफणी करायलाही बंदी घालतो…
मालक म्हणतो, कामगार सामान्य दिसावा…!
म्हणून मी फेसात केस बुडवते
पण फेसातलं विष मला नासवतं
तुझ्यासारखं दिसणं मला फेटाळतं…
तुझ्यासारखी सुंदर दिसूच शकत नाही मी…
आता मला सांग…
मग मी काय बाई नाही…?
तू गोरी म्हणून तुला मखरात बसवतात
मला भरदिवसा मळ्यातच कुस्करतात
तू रडलीस तरी लालबूंद होतेस
माझं रक्तही पाणीच ठरतं…
अनेकदा वाटतं गोरं व्हावं तुझ्यासारखं
माझा नि तुझा ऋतूस्त्राव सारखाच असतो म्हणून…
पण हेही तितकंच खोटं आहे गं,
चिंध्यांच्या घड्या नि कापसात फरक आहे गं…
आता मला सांग…
मग मी काय बाई नाही…?
तू एखाद वेळेसच गर्भारतेस
मी अनेकदा नवीन जन्म घेते
खेळणीही तुझी गुलामी करतात
मी गुलामांनाच जन्माला घालते…
तेच गुलाम तुझं शेत नांगरतात
तुझ्या घरादाराची रक्षा करतात
तुझा हक्काचा विरंगुळा होतात
नराधम म्हणून ठारही मारले जातात… नि,
माझी पिशवी कायमच रिकामी राहते…
आता मला सांग…
मग मी काय बाई नाही…?
तुला बग्गीतही बसवावं लागतं
म्हणून तू गुलाम
मी पहारीने दगड फोडते
म्हणून मी गुलाम…
तुझं गोरेपण तुझ्या गुलामीचं कारण
माझं काळेपण माझ्या गुलामीचं कारण
आता मला सांग…
मग मी काय बाई नाही…?
न्यूज अनकट प्रतिनिधी : निखिल जाधव