पुरंदर दि.८ जून २०२०: २३ मार्चपासून शासनाने राज्यातील सलूनची दुकाने बंद केली आहेत. तेव्हापासून सलून व्यावसायिक आपल्या रोजी-रोटीपासून दूर आहेत. आता शासन सगळे व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देत आहे .मात्र सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत नाही. त्यामुळे आठ तारखेला सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी न दिल्यास नऊ तारखेला आंदोलन करण्याचा इशारा पुरंदर तालुक्यातील नाभिक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सलून व्यवसाय सुमारे अडीच महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. एकतर दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी द्यावी, अन्यथा दरमहा आर्थिक मदत करावी ही मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. ८ जून रोजी शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास दि.९ जून रोजी आंदोलनाचा इशारा पुरंदर तालुका नाभिक महामंडळाने दिला आहे.
या मागणी बाबत राज्यसंघटनेने २० एप्रिल रोजी शासनाला पत्र दिले होते. ५ जूनला स्मरण पत्र देण्यात आले आहे. मात्र शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. दि.८ जून रोजी शासनाने सलून उघडण्याबाबत निर्णय न घेतल्यास दि.९ जून रोजी पुरंदर तहसीलदार कार्यलयासमोर सलून साहित्य धोपटी घेऊन आंदोलन करणार असल्याचे पुरंदर नाभिक महामंडळाचे अध्यक्ष राहुल मगर, कार्याध्यक्ष भारत मोरे, उपाध्यक्ष सुशील गायकवाड, सागर विभाड, सचिव तुकाराम भागवत यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे