इंदापूर, दि.५ मे २०२० : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यात सोमवार दि. ३ रोजी मध्यरात्री सोलापूर पोलिसांनी जवळपास शंभर ते दीडशे मजूरांनी भरलेला ट्रक सोलापूर जिल्ह्यातून इंदापूरजवळील सरडेवाडी येथील एका खाजगी मंगल कार्यालयात आणून सोडला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातून पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावरून परप्रांतातील मजूर आपल्या गावी जाण्यासाठी एका ट्रक मधून इंदापूर तालुक्याच्या बाहेर पडून सोलापूर जिल्ह्यातून चालले होते . ही बाब सोलापूर पोलिसांना समजली असता, त्यांनी इंदापूर पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता शंभर ते दीडशे मजूरांनी भरलेला ट्रक इंदापूर जवळच्या सरडेवाडी येथील कार्यालयात आणून सोडल्याने एकच खळबळ माजली आहे.
येथील कार्यालयात अगोदरच दोनशेहून जास्त मजूर लोकांची राहण्याची व्यवस्था केली आहे. मात्र त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत असताना सोलापूर पोलिसांनी केलेल्या प्रतापामुळे इंदापुरातील नागरिक कमालीचे भयभीत झाले आहेत.
याबाबत इंदापूरचे तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्रांत अधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की, हे मजूर तुमच्या तालुक्यातून आमच्या जिल्ह्यात आले असल्याने आम्ही त्यांना तुमच्या तालुक्यात आणून सोडले. सध्या इंदापूर येथील कार्यालयात मजुरांची राहण्याची व्यवस्था केली आहे. तेथे ते दोनशेहून अधिक मजूर राहत होते. त्यांच्या अन्न पाण्याचा पुरता बोजवारा उडाला असून त्यातच भर म्हणून की काय सोलापूर प्रशासनाने शंभर ते दीडशे मजूर पुन्हा आणून येथे सोडले त्यांची कसलीही वैद्यकीय तपासणी केलेली नाही. त्यामुळे इंदापुरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. राज्य सरकारने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन त्वरित तोडगा काढावा अशी मागणी येथील स्थानिकांनी “न्युज अनकट” शी बोलताना केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे