मांजरी: दि. ०३ सप्टेंबर २०२०: महादेव नगर येथील एस. एम. जोशी विद्यालयामधील शिपायाने शाळेच्या स्टाफरूममध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
शिवलिंग उर्फ सागर कोरे वय ४१ रा. महादेवनगर मांजरी असे गळफास घेतलेल्या शिपायाचे नाव आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले पत्नी असा परिवार आहे.
हडपसर पोलिस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलिंग कोरे हे एस. एम. जोशी विद्यालयात शिपाई म्हणून काम करत होते.
कंट्रोल वरून गळफास घेतल्याचा कॉल आल्याने घटनास्थळी पाहणी केली असता. शाळेच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या स्टाफरूममध्ये कोरे यांनी सिलिंगच्या हुकला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मदतीने त्यांना खाली घेऊन, पुढील कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेहाचा दुर्गंध येत असल्याने दोन दिवसापूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
मृतदेहाच्या शेजारी कोणतीही सुसाईड नोट मिळून आली नाही. त्यामुळे आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवसापासून ते घरी गेले नव्हते. त्यांना ट्रेकींगची सवय असल्याने त्यांच्या घरच्यांनीही ते घरी आले नसल्याबाबतची तक्रार केली नव्हती. कोरे हे शिपाई असल्याने विद्यालयाच्या खोल्यांच्या चाव्या ह्या त्यांच्याकडेच होत्या. परंतु, कोरे यांनी नेमकी आत्महत्या का केली. ? याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही पुढील तपास हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी मनोज पाटील करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे