जावयानेच केला सासऱ्याचा खुन

पुरंदर, दि. ९ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील जेजुरी नजीकच्या नाझरे सुपे येथे जावयाने सासऱ्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील विवाहिता नाझरे सुपे येथील आपल्या माहेरी आली होती. याचा राग मनात धरत जावयाने सासऱ्याच खुन केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील विवाहिता सुरेखा सुरेश भोसले ही नाझरे सुपे येथील आपल्या माहेरी आठ दिवसांपूर्वी आली होती. तिला सासरी नेहण्यासाठी काल ८ ऑगस्ट रोजी तिचा पती सुरेश सदाशिव भोसले हा सासरी नाझरे सुपे येथे आला होता .सुरेश हा पत्नीचा छळ करीत असल्याने ती आठ दिवसांपूर्वी आपल्या माहेरी आली होती.

काल सायंकाळी पाचच्या सुमारास मुलीचे वडील त्यांच्या शेतामध्ये त्यांची पत्नी, मुलगी व दोन मुलांसोबत काम करत असताना जावई सुरेश भोसले शेतामध्ये आला. ‘माझी बायको का पाठवत नाही?’ असे म्हणून किसन काळे यांचे बरोबर भांडू लागला. वाद-विवाद, बाचाबाची सुरू असताना जावई सुरेश भोसले याने खिश्यातून चाकू काढत सासरे काळे यांच्या पोटात खूपसला. त्यामुळे काळे गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही मुलांनी काळे यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान काळे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा नितीन किसन काळे यांनी जेजुरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून सुरेश सदाशिव भोसले यांच्याविरुद्ध माधवी कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सुरेश भोसले हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई नंदकुमार सोनवलकर हे करत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा