सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह, गेल्या अनेक दिवसांपासून बैठकांमध्ये सहभागी अनेक नेत्यांनाही लागण

नवी दिल्ली, 2 जून 2022: सोनिया गांधींना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिलीय. रणदीप सुरजेवाला यांनी असंही सांगितलं की, यापूर्वी सोनिया गांधी ज्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटल्या होत्या त्यापैकी अनेकांनाही कोरोनाची लागण झालीय. सुरजेवाला यांच्या म्हणण्यानुसार, सोनिया गांधी यांना काल (बुधवार) संध्याकाळी सौम्य ताप आला होता, त्यानंतर त्या कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आल्या.

सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधींनी सध्या स्वत:ला क्वारंटाईन केलंय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे. 8 जूनपूर्वी सोनिया बऱ्या होतील, अशी आशा सुरजेवाला यांनी व्यक्त केली.

8 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणात ही चौकशी होणार आहे. सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी दोन-तीन दिवसांत बरं होण्याची अपेक्षा आहे.

सुरजेवाला म्हणाले की, सोनिया गांधी यांनी मला विशेषत: सांगितलं आहे की त्या 8 तारखेला ईडी (अंमलबजावणी संचालनालय)समोर हजर राहतील.

त्याचवेळी राहुल गांधी यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलावलं होतं मात्र ते गेले नाहीत. राहुल सध्या परदेशात असल्याने त्यांनी ईडीकडे आणखी वेळ मागितला आहे.

नॅशनल हेराल्डमध्ये काय प्रकरण आहे?

2012 मध्ये नॅशनल हेराल्डचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले.

दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची 2000 कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप स्वामींनी केला होता. कटाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा