मुंबई, २१ फेब्रुवारी २०२३ : बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईतील चेंबूर परिसरात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यावतीने आयोजित फेस्टिवलमध्ये सोनू निगम उपस्थित होता. त्यावेळी सेल्फी घेण्याच्या वादातून आमदाराच्या मुलाची सोनू निगम आणि त्याच्या टीमसोबत झटापट झाली. सोनू परफॉर्म करत असताना स्थानिक आमदाराने सोनूची टीम मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूर फेस्टिवलमध्ये सोनू निगम गाणे गाण्यासाठी आला असता, यावेळी आमदार प्रकाश फरतेपेकर यांच्या मुलाला सोनू निगम सोबत फोटो काढायचा होता. सोनू च्या टीमने मज्जाव केला असता, त्यांच्या वाद झाला आणि त्यानंतर त्यांच्यात धक्काबुक्की झाली.
याबाबत अधिक माहिती देताना झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी सांगितले की, या प्रकरणी स्वप्निल फातर्पेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.
- व्हिडीओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कार्यक्रम संपल्यानंतर सोनू निगम त्याच्या असिस्टंटसोबत स्टेज वरून खाली उतरत असताना सेल्फी घेण्यासाठी आलेली लोक त्याच्या जवळ जात होती. यावेळी त्यांना बाजूला करत असताना असिस्टंटला धक्काबुक्की झाल्याने तो पायऱ्यांवरून खाली पडल्याचे दिसत आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.












































