सोनू सूदचे वर्तन नाराजीजनक

मुंबई, ५ जानेवारी २०२३ : अभिनेता सोनू सूद याने काही दिवसांपूर्वी ट्रेनच्या प्रवासाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओची दखल रेल्वेने घेतली आहे. तसे बघायला गेले तर सोनू सूदला ‘देवदूत’ म्हणून संबोधले जाते. तो करीत असलेल्या प्रत्येक कार्याला प्रोत्साहन दिले जाते; परंतु रेल्वेने केलेल्या ट्विटवरून काही वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. या ट्विटमधून सोनू सूदला प्रोत्साहन दिले नसून त्याच्या वर्तनास फटकारले गेले आहे.

१३ डिसेंबर रोजी सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनू सूदने त्याचा रेल्वेमधील एक व्हिडिओ पोस्ट केला. त्यानंतर लगेचच जीआरपी मुंबईचा अधिकृत ट्विटर अकाउंटवरून नाराजी व्यक्त केली गेली. या व्हिडिओमध्ये दाखविल्यानुसार तो धावत्या ट्रेनच्या फूटबोर्डवर बसला होता. सध्या रेल्वेस्थानकांवर घडत असलेल्या अपघातांची संख्या बघता अशा पद्धतीने प्रवास करणे योग्य आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय. आणि म्हणूनच रेल्वेने सोनू सूदच्या व्हिडिओला प्रतिक्रिया देत एक विनंती केली आहे.

सोनू सूदच्या व्हिडिओवरील रेल्वेची प्रतिक्रिया-
‘प्रिय सोनू सूद, संपूर्ण जगातील लाखो लोकांसाठी तुम्ही एक आदर्श आहात. ट्रेनच्या फूटबोर्डवर बसून प्रवास करणे धोकादायक आहे. अशा पद्धतीचा व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे जनतेपर्यंत चुकीचा संदेश पोहोचू शकतो. कृपया असे करणे टाळा. सुरक्षित यात्रेचा आनंद घ्या.’

तर सोनू सूटसाठी जीआरपी मुंबईचाही संदेश-
फूटबोर्डवर बसून प्रवास करणं हे चित्रपटात मनोरंजक वाटू शकतं; परंतु खऱ्या आयुष्यात नाही. सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यात आणि नवीन वर्ष सर्वांसाठी आनंदी जावो, अशी आशा करूयात.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा