हवेली तालुक्यातील सोरतापवाडी गाव अद्याप तरी कोरना पासून दूर

उरुळीकांचन, दि. ८ जून २०२०: मागील अडीच महिन्यापासून कोरोनाव्हायरसने थैमान घातले असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी सारखे दहा हजार लोकसंख्येचे गाव मात्र पूर्णपणे कोरोना पासून अद्याप तरी दूर आहे. येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांनी एकत्र येऊन घेतलेल्या वेगवेगळ्या खबरदारीमुळे सोरतापवाडी हे गाव कोरोना फ्री आयुष्य जगत आहे.

उरळीकांचन, लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, हवेली तालुक्यातील असे अनेक गावामध्ये कोरोनाने थैमान घातले होते. पूर्व हवेली मधील उरळीकांचन, कुंजीरवाडी, लोणी काळभोर, कोरेगाव मुळ, कदमवाक वस्ती, या सारख्या गावात मागील साठ दिवसाच्या कालावधीत वीसहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर तीन कोरोनाग्रस्त रुग्णांना आपला जीवही गमवावा लागला आहे. पुणे सोलापूर महामार्ग लगत असलेले सोरतापवाडी या गावत व परिसरात अद्याप तरी एक ही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. विशेष म्हणजे सोरतापवाडी ग्रामस्थांनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन केल्यामुळे कोरोनाला आपल्या गावात एन्ट्रीच करू दिलेली नाही. गाव अगदी निर्धास्त आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हे गाव आहे. फुलांचे गाव म्हणून ओळख असलेले सोरतापवाडी हे गाव सुमारे दहा हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथील बहुसंख्य गावकऱ्यांचे उरळीकांचन पुणे शहरात कामानिमित्त ये-जा असते तरी स्वयंशिस्त व शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या पालनामुळे कोरोनाला गावात येऊ दिलेले नाही. गावकरी सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन यांनी गावातील प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून गावकर्‍यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले आहे. दुसरीकडे गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने योग्य ती खबरदारी घेतली आहे यामुळे दहा हजार लोकसंख्या असलेले सोरतापवाडी हे गाव बिनधास्त आयुष्य जगत आहे. राज्यातील प्रत्येक गावापुढे आपला एक आदर्श निर्माण केला आहे. घरात राहा, स्वतःला व गावाला सुरक्षित ठेवा, व कोरोना पासून बचाव करा हा सोरतापवाडी करांनी सगळ्यांना संदेश दिला आहे. येथील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक यांच्या मार्फत गावातील वाड्या-वस्त्यांवर जाऊन आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याबाबत व कोरोनाला दूर ठेवण्यासाठी ही सूचना दिल्या व तसेच नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड केल्यामुळे काही नागरिकांच्या आरोग्याबाबत समस्या समजल्याने, त्यांच्यावर प्रथमोपचार व पुढील वैद्यकीय तपासणीसाठीच्या सूचनाही देण्यात आल्या व यादरम्यान कोरोनाला गावापासून दूर ठेवण्यासाठी ग्रामस्थांच्या बरोबरच माजी सरपंच सागर चौधरी, उपसरपंच भाऊसाहेब चौधरी, ग्रामविकास अधिकारी संतोष नेवसे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चौधरी, सुनिता कड, स्वाती चोरघे, भारती चौधरी, अलका चौधरी, सहदेव सावंत, संजय जगताप, चंद्रकांत चौधरी, अप्पासाहेब वालेकर, यांनी मोलाची मदत केल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा