स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ टपालाचे विशेष कव्हर प्रकाशित

मुंबई, दि. १४ मे २०२०: स्थलांतरीत कामगारांच्‍या सन्‍मानार्थ भारतीय पोस्ट खात्याने एका विशेष समारंभात मुंबईतील जनरल पोस्ट ऑफिसच्या ऐतिहासिक इमारतीतील बायसेंटेनरी सभागृहात टपालाचे एक विशेष कव्हर प्रकाशित केले.

या समारंभाचे वैशिष्ट्य म्हणजे, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे प्रमुख पोस्ट मास्टर जनरल, हरिश चंद्र अगरवाल आणि मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर स्वाती पांडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात पाच वेगवेगळ्या विभागातील स्थलांतरित कामगारांना बोलावून त्यांच्या हस्ते हे कव्हर प्रकाशित करण्यात आले. या स्थलांतरीत कामगारांमध्ये भारतीय टपाल विभागासाठी मास्क शिवणा-या एका शिंप्यासह दोन बांधकाम मजूर, टॅक्सीचालक, सोनारकाम करणारा कारागीर यांचा समावेश होता.

देशाभरातील टाळेबंदीच्या काळात विविध ठिकाणी अडकलेले स्थलांतरीत कामगार आपापल्या राज्यांत परतण्याच्या प्रयत्नात असतांना हा समारंभ झाला.

“विविध राज्यातील मूळ निवासी कामगारांचा हातभार मुंबईतील सर्व कामांना लागत असतो, हे त्यांचे उपकार मान्य करायलाच हवेत, शहरातील वातावरणाचा हे कर्मचारी महत्वपूर्ण भाग असून, त्यांच्या या कष्टांना दाद देण्याची हीच योग्य वेळ आहे ” असे प्रमुख पोस्ट मास्टर जनरल हरीश चंद्र अगरवाल यावेळी बोलतांना म्हणाले.

“उत्तरप्रदेश, बिहार, अथवा पश्चिम बंगाल या राज्यातील दुर्गम भागांतून येणाऱ्या या स्थलांतरीत कामगारांनी मुंबईच्या उभारणीसाठी मोठे योगदान दिले असून त्यामुळेच मुंबईकरांचे जीवन निर्विघ्नपणे आणि  सुरळीतपणे चालत असते, या विशेष टपाल कव्हरद्वारे त्यांचा संघर्ष आणि योगदान हे भारताच्या इतिहासात नोंदविले जाण्याचा हा प्रयत्न आहे, “असे पोस्ट मास्टर जनरल श्रीमती स्वाती पांडे यावेळी  म्हणाल्या.

सुप्रसिद्ध टपाल संग्राहक संदीप मुरजानी यांनी यावेळी स्थलांतरीत कामगारांना धान्य वाटप केले. या समारंभाला सामाजिक अंतर ठेवण्याच्या संकेतांचे काटेकोरपणे पालन केले गेले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा