लोकसभा निवडणूक २०२४ अनुषंगाने संशयास्पद रोख रकमेच्या व्यवहारावर विशेष लक्ष केंद्रीत करावे – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना, १९ मार्च २०२४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. आचार संहिता लागू झाल्यापासून रोख रक्कम बाळगणे त्याची वाहतूक इत्यादीबाबत नियंत्रण येते. तरी मतदारांना लाच दिली जाण्याकरिता वापरण्यात येईल असा कोणत्याही इतर संशयास्पद रोख रकमेच्या व्यवहारावर विशेष लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली आहे. जिल्ह्यातील विविध राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका व पतसंस्था व्यवस्थापकांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ म्हणाले कि, जिल्ह्यातील सर्व बँकांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांचे बँक खाते उघडणे व धनादेश पुस्तिका देण्याची विशेष व्यवस्था करावी. निवडणुकांच्या दरम्यान बँकेद्वारे निर्दोष व विश्वसनीय रोख रकमेच्या वाहतुकीच्या संबंधात केंद्रीय वित्त मंत्रालय भारत सरकार यांचे पत्र दि. २० फेब्रुवारी २०१३ नुसार कारवाई करावी. मागील दोन महिन्यांत खात्यात रक्कम जमा करणे किंवा काढणे अशा प्रकारचा कोणताही दाखला नसतांना निवडणूक प्रक्रियेचा कालावधीत रुपये १ लाखांपेक्षा अधिक रक्कम एखाद्या बँकेच्या खात्यातून नेहमीपेक्षा वेगळ्या रितीने आणि संशयास्पदरित्या काढणे किंवा खात्यात जमा करणे, निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत एखाद्या जिल्ह्यातील व मतदारसंघातील अनेक व्यक्तींच्या खात्यात एका बँक खात्यातून अशा हस्तांतरणाच्या कोणत्याही पूर्व दाखल्याशिवाय आरटीजीएसद्वारे रकमेचे नेहमी पेक्षा वेगळ्या रीतीने हस्तांतरण करणे, याबाबीवर लक्ष ठेवावे असेही त्यांनी सांगितले.

उमेदवारांकडून दाखल करण्यात आलेल्या शपथपत्रात नमुद केल्यानुसार उमेदवारांच्या किंवा त्याच्या पतीच्या, पत्नीच्या किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीच्या बँक खात्यात रुपये १ लाखापेंक्षा अधिक रक्कम रोखीने जमा केली जाणे किंवा बँक खात्यातून काढली जाणे, निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत राजकीय पक्षाच्या खात्यातून रुपये १ लाखांपेक्षा अधिक रक्कम काढली जाणे किंवा खात्यात जमा केली जाणे यावर कटाक्षाने नजर ठेवा अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा