दौंड, दि.१० मे २०२० : देशभरात लॉकडाऊनच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने जिवाच्या आकांताने परप्रांतीय कामगार पलायन करीत आहेत. राज्यातील अनेक उद्योग बंद असल्याने यामध्ये फार मोठी भर पडली आहे. ग्रामीण भागातील कामगार वर्ग आज जरी सुरक्षीत असला तरी मात्र कामगारांची अस्वस्थता पाहता राज्य सरकारने विशेष रेल्वेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
राज्यातील अनेक अत्यावश्यक परवाना असणाऱ्या औषध निर्माण उद्योगाला कामगारांच्या अभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जर काम सुरळीतपणे सुरू झाले नाही तर मात्र बऱ्याच प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.
कुरकुंभसारख्या देशातील अग्रगण्य रासायनीक प्रकल्पात सध्या तीन हजारापेक्षा कमी कामगार असून सुमारे दहा हजार कामगार विविध मार्गाने यापूर्वी निघून गेलेले आहेत. विशेष रेल्वेच्या माध्यमातून जवळपास बाराशे कामगारांना दौंड तालुक्यातून सोडण्यात येणार आहे.
या सर्व कामगारांची ऑनलाइन प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे. ज्यांचा समावेश या यादीत आला आहे अशा कामगारांना या विशेष रेल्वेच्या सुविधेचा उपयोग होणार आहे. लॉकडाऊनच्या कालावधी बाबत काहीच स्पष्टता समोर येत नसल्याने व दौंड येथे कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या पाहता कामगार धास्तावले आहेत.
त्यामुळे हाताला काम असताना देखील आपल्या राज्यात माघारी जाण्याचा निर्णय घेत आहेत.यादीत समावेश न झाल्याने अनेक कामगारांच्या पदरी निराशाच आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख