नवी दिल्ली, २१ ऑक्टोबर २०२२ : दिल्लीत फटाक्यांच्या बंदीविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. सर्वोच्च न्यायालयानेे याचिका फेटाळून लावताना, ताशेरे देत म्हंटले आहे की, लोकांना शुध्द आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊ द्या , सण साजरा करण्याचे इतर मार्ग आहेत. लोकांनी मिठाईवर पैसे खर्च केले पाहिजे, ना की फटाक्यांवर.
दिल्लीत १ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये फटाके बनवले जाणार नाहीत आणि साठवलेही जाणार नाहीत तसेच विकलेही जाणार नाहीत. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ही घोषणा केली आहे.
फटाक्यांचा वाद आता राजकीय झाला आहे. आप आणि भाजप यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी, दिल्ली उच्च न्यायालयाने ,दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या फटाके बंदीच्या निर्णयाविरोधात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला होता. कारण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ होते.
आज जवळपास सगळ्याच फटाक्यांमध्ये प्रकाशाच्या वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी रसायने वापरली जातात. यातील रसायने पर्यावरणासाठी तसेच माणसाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. सध्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये वायू प्रदूषणामुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत.
गेल्या वर्षीही प्रदूषण नियंत्रण समितीने फटाक्यांवर बंदी घातली होती. कारण दिल्लीत हिवाळ्यामध्ये प्रदुषणात कमालीची वाढ होते. हवा दुषित झाल्याने श्वसनाचे आजार वाढतात. दिल्लीत फटाके खरेदी-विक्री वर आणि फटाके फोडण्यावर बंदी आहे. याचे उल्लंघन झाल्यास २०० रुपये दंड आणि ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे