‘स्पर्म व्हेल’ आणि अंबरग्रीस

मुंबई : ९ऑगस्ट २०२२; अत्यंत दुर्मीळ असे अंबरग्रीस मौल्यवान आहे, म्हणूनच तस्करांची त्यावर नजर असते. तर अंबरग्रीस कुठे मिळते,आणि त्याचा वापर कुठे होतो? याबद्दल सामान्य माणूस अज्ञानी आहे असे कळते.

संशोधकांना १८००च्या शतकात जेव्हा देवमाशांची कत्तल केली जाऊ लागली, तेव्हा असे लक्षात आले की, फक्त ‘स्पर्म व्हेल’ ही देवमाशांची एकच प्रजात अंबरग्रीस तयार करते. ‘स्पर्म व्हेल’चे प्रमुख खाद्य म्हणजे माखली(स्क्वीड) सारखे मृदुकाय प्राणी आणि त्यासारखे इतर जीव. माखल्यांच्या सेवना नंतर न पचणारे घटक, म्हणजेच माखल्यांचे दात आणि मधला पाठीवरचा कवचाप्रमाणे असणारा काटा हे घटक पचण्या सारखे नसतात. अशा वेळी ‘स्पर्म व्हेल’ आपल्या पोटात एक विशिष्ट चिकट स्राव सोडून न पचणाऱ्या घटकांभोवती एक आवरण तयार करतात. हा पदार्थ उलटीद्वारे बाहेर पडतो किंवा विष्ठेसोबत बाहेर सोडला जातो. हा पदार्थ समुद्राच्या पाण्यावर तरंगू शकतो. यालाच अंबरग्रीस असे म्हणतात.

अंबरग्रीसला उग्र वास असतो. मात्र, कालांतराने या वासात बदल होऊन याला कस्तुरी सारखा सुगंध प्राप्त होतो. यात अंब्रीन नावाचे घटक असतात, ज्यामुळे परफ्यूमचा सुगंध दीर्घ काळ टिकण्यास मदत होते. त्यासाठीच परफ्यूम उद्योगात या अंबरग्रीस ची मागणी आहे. अंबरग्रीसचा उपयोग विविध सौंदर्यप्रसाधनात होतो. लिपस्टिक हे एक त्याचे उदाहरण.

अंबरग्रीस साठी ‘स्पर्म व्हेल’ ची मोठ्या प्रमाणावर शिकार हात होती. परंतु आता ‘स्पर्म व्हेल’ ला वन्यजीव सरंक्षण अधिनियम, १९७२अंतर्गत संरक्षण मिळाले असून त्यांच्या शिकारीवर बंदी आहे. तसेच, अंबरग्रीसच्या वापरावर आणि व्यापारावरदेखील निर्बंध आहेत. लाखो रुपये मिळवून देणाऱ्या या अंबरग्रीस ला महत्त्व असल्याने त्याची तस्करी होत आहे. भारतात ही प्रजाती संरक्षित असल्यामुळे अंबरग्रीसच्या व्यापारावर बंदी असली, तरी बऱ्याच देशांत अंबरग्रीस ही विष्ठा ठरत असल्यामुळे याच्या व्यापाराला परवानगी आहे.परंतु भारतात त्यावर बंदीच असावी अशी पर्यावरण प्रेमींची मागणी आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा