एसटी कर्मचाऱ्यांना ३ महिन्यांचं थकीत वेतन दिवाळीआधी मिळणार

मुंबई, ११ नोव्हेंबर २०२० : एसटी कर्मचाऱ्यांना त्यांचं गेल्या ३ महिन्यांचं थकीत वेतन दिवाळीआधी मिळणार आहे. परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावं, यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते.

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी, तर आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या सोबत बैठक झाली, आणि यावर मार्ग काढला. त्यानुसार राज्य शासनानं एसटीसाठी पुढच्या सहा महिन्यांकरता आर्थिक मदत म्हणून एक हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं आहे, असं परब यांनी सांगितलं.

टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवा वगळता पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. याकाळात एसटीला प्रवासी वाहतुकीतून मिळणाऱ्या सुमारे ३ हजार कोटी रुपये महसुली उत्पन्नाचं नुकसान झाले आहे. त्यामुळे इतर खर्च, वेतन, गाड्यांची देखभाल, बसस्थानकांची पुनर्बांधणी यापोटी थकीत रक्कम वाढत गेली. आणि कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत राहिले आहे.

हळूहळू प्रवासी संख्या दिवसागणिक वाढत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानं लवकरच एसटीचं अर्थकारण पूर्वपदावर येईल. शासनाकडूनही आता आर्थिक मदत मिळाल्यानं एसटीच्या अडचणी दूर होण्यात मदत होणार आहे, असं परब म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा