एस.टी. तील महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित

मुंबई, २६ सप्टेंबर २०२२ : एस. टी. च्या महिला कर्मचारी बालसंगोपन रजेपासून वंचित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सण असो, यात्रा असो व आपत्कालीन परिस्थिती एस. टी. कर्मचाऱ्यांना नोकरीवर हजर राहत सेवा बजवावी लागते. त्यामुळे ना रजा, ना रजांचा मोबदला. कुटुंबासाठी वेळ देता येत नसल्याने एस.टी. महामंडळातील महिला कर्मचाऱ्यांना बालसंगोपन रजा देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्र्यांनी घेतला होता. मुलांचे शिक्षण व त्यांच्याकडे लक्ष देता यावे या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला होता. तरीही त्याचे पालन नीट होत नसल्याने अनेक महिला कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे. गरजेच्या वेळी सुट्या दिल्या जात नाहीत. अनेकांच्या रजा बुडल्याचीही उदाहरणे आहेत. महिलांना १८० दिवसांची रजा कुठल्याही प्रकारचे बंधन न घालता मिळावी, अशी मागणी महिला कर्मचाऱ्यांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे.

या रजेचा लाभ महिला कर्मचारी, तसेच पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसेच ज्या कर्मचाऱ्याची पत्नी असाध्य आजाराने अंथरूणाला खिळली आहे. अशा पुरुष कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याचे परिपत्रक निघाले होते. परंतु, प्रत्यक्षात या रजांचा लाभ अनेकांना मिळत नाही. रजांच्या बदल्यात एस.टी. महामंडळाकडून मोबदला देण्यात येत नाहीत.

महामंडळातील महिला कर्मचारी, तसेच अधिकारी यांना त्यांच्या मुलांच्या संगोपनासाठी सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मंजूर करण्याचा निर्णय तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी २०१८ मध्ये जाहीर केला होता. काही महिन्यांनी त्यामध्ये सुधारणा करीत महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतिकाळात सहाऐवजी नऊ महिन्यांची रजा देण्याचा निर्णयही घेण्यात आला. पण गेल्या दोन वर्षांपासून या बालसंगोपन रजेचा लाभ मिळालेला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा