रत्नागिरी ७ डिसेंबर २०२३ : राज्य परिवहन विभागाने घोळवली येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक अंतरापर्यंत एसटीची सोय करावी, अशा सूचना_ जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक आज झाली. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, तहसीलदार हणमंत म्हेत्रे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित अशासकीय सदस्यांनी ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने विविध समस्यांवर चर्चा केली. यावर जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी विविध विभागांना सूचना दिल्या. 108 रुग्णवाहिकेत रुग्णाच्या बाजूला डॉक्टरांनी असायला हवे. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हॉटेलमधील स्वच्छतेबाबत तपासणी करावी. शालेय पोषण आहाराचा दर्जा तपासावा. आरोग्य विभागाने पोफळी येथील आरोग्य उपकेंद्रात मनुष्यबळ उपलब्ध करुन द्यावे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने चिपळूणसह अन्य रेल्वे स्थानकांनजिक रिक्षा थांब्यांवर प्रवाश्यांसाठी रिक्षा भाडे दरपत्रक प्रदर्शित करावे. जादा भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी. घोळवली येथील विद्यार्थ्यांना हायवेच्या कामामुळे 9 किमी चालत जावे लागते. याठिकाणी अन्य वाहने जात आहेत. त्याबाबत सद्यस्थिती पाहून राज्य परिवहन विभागाने विद्यार्थ्यांसाठी योग्य अंतरापर्यंत एसटीची सोय करावी.
जन्म-मृत्यू नोंदणी दाखले देण्याबाबतची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार १ डिसेंबरपासून होत आहे. मध्यान भोजन आणि अंगणवाडीबाबत सद्यस्थिती काय आहे? याबाबत जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यक्रम अधिकाऱ्यांनी तपासणी करावी.
न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर